पतंगबाजीत देशी दोऱ्याला चांगले दिवस
By Admin | Updated: January 14, 2015 00:44 IST2015-01-13T23:49:00+5:302015-01-14T00:44:12+5:30
नॉयलॉन दोऱ्याला बंदी : पर्यावरण, पक्षीसाठी धोकादायक ठरत होते परदेशी दोरे

पतंगबाजीत देशी दोऱ्याला चांगले दिवस
कोल्हापूर : पतंग उडविताना नॉयलॉनच्या दोऱ्याने पर्यावरणास होणाऱ्या हानीमुळे मांजा दोऱ्याच्या वापरावर नागपूर पोलिसांनी घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. त्यामुळे आता देशी (सुती) दोऱ्याला चांगले दिवस आले आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान आपल्याकडे पतंग उडविण्याचा हंगाम असतो. मकर संक्रांतीच्या काळात पतंगबाजीसाठी दोऱ्याला मोठी मागणी असते. पूर्वीपासून देशी (सुती) दोऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांपासून नॉयलॉन, चायना दोरा बाजारात आल्याने त्यांना मागणी वाढली आहे.
नॉयलॉनचा दोरा सहजासहजी तुटत नसल्याने तसेच दोन-चार वर्षे टिकत असल्याने अनेकांची याला मागणी होती. परिणामी देशी दोऱ्याची मागणी घटली होती. दुकानदाराने जरी देशी दोरा विक्रीसाठी ठेवला तरी ग्राहकांची मागणी सर्वांत जास्त नॉयलॉन दोऱ्यांना होऊ लागली होती. यामुळे दुकानदारांना हा दोरा विक्रीसाठी ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता.
नॉयलॉन दोरा लवकर तुटत नव्हता, तसेच एखाद्या झाडावर तो अडकला की प्राणी, पक्ष्यांना त्याची मोठी इजा होत होती. तसेच मुलांच्या हाताला व गळ््याला इजा होत होती. हा दोरा खराब होत नसल्याने पर्यावरणास तो हानीकारक होता. त्या तुलनेत देशी दोरा अनेक अर्थांनी फायदेशीर ठरतो.
कोल्हापुरात देशी दोरा कागल, इचलकरंजी, वारणा या स्थानिक बाजारपेठेतून विक्रीस येतो. प्रामुख्याने गुजरात, अहमदाबाद व जयपूर येथे तयार होऊन संपूर्ण भारतात विक्रीसाठी जातो, तर नॉयलॉनचा दोरा प्रामुख्याने मुंबई येथून येतो. दोन्ही दोऱ्यांचे दर साधारणपणे १०० रुपये ते ५०० रुपयांपर्यंत आहेत.
नॉयलॉन दोऱ्यावरील बंदीचा निर्णय योग्य आहे. यामुळे अनेक पक्ष्यांसह माणसांना इजा होत होती. नॉयलॉन दोरा जास्त काळ टिकत असल्याने ग्राहकांची याला मागणी असल्याने आम्ही तो विक्रीसाठी ठेवत होतो. मात्र, या निर्णयामुळे आता देशी दोऱ्यांना मागणी वाढणार आहे.
-इम्रान तांबोळी,
पतंग विक्रेते
नॉयलॉन दोरा लवकर खराब होत नाही. निसर्गात त्याचे लवकर विघटन होत नसल्याने तो पक्ष्यांच्या पंखांना व पायाला लागून त्यांना इजा होते. या प्रकारामुळे काही पक्ष्यांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे.
- प्रा. अभिजित कदम,
पर्यावरण शिक्षक.