शिरोली : येथील तानाजी श्रीरंग साळुंखे (वय ४२, मूळ रा. ढवळेश्वर, ता. विटा, जि. सांगली; सध्या रा. साई कॉलनी, शिरोली) यांचा रेबीजने रविवारी सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे शिरोली परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी साळुंखे हे गेल्या १५ वर्षांपासून शिरोलीत राहतात. ते सोनार व्यवसाय करीत होते. दीड महिन्यापूर्वी ते आपल्या ७ वर्षांच्या मुलीला घेऊन खाऊ आणण्यासाठी शिरोली फाटा येथे गेले होते. तेव्हा त्यांच्या दुचाकीच्या दिशेने एका भटक्या कुत्र्याने धाव घेतल्याने ते रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली होती.मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत अचानक बदल दिसू लागला. शुक्रवारी त्यांना पाण्याची भीती वाटू लागली, कंठ दाटून येत होता तसेच खाण्याचा त्रास जाणवू लागला. नातेवाइकांनी त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर मानसोपचारतज्ज्ञांनी हे लक्षण श्वानदोष (रेबीज) असल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर तातडीने शनिवारी त्यांना सीपीआरला हलविण्यात आले.सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी साळुंखे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, नातेवाईक असा परिवार आहे.
तानाजी साळुंखे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्या ठिकाणी चौकशी केली असता त्यांना पाण्याची भीती, कंठ दाटून येत होता तसेच खाण्याचा त्रास जाणवू लागला. ही सगळी लक्षणे रेबीजची आहेत. - डॉ. जेसिका अँड्र्युस, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरोली