दीनानाथ सिंह यांच्या हिंदकेसरी किताबाचा सुवर्ण महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:25+5:302021-03-27T04:25:25+5:30
कोल्हापूर : उत्तर प्रदेशातील अलाहाबादजवळील कुत्तुपूर या छोट्याशा खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा ते भारताचा पाचवा हिंदकेसरी अशी दीनानाथ सिंह यांच्या ...

दीनानाथ सिंह यांच्या हिंदकेसरी किताबाचा सुवर्ण महोत्सव
कोल्हापूर : उत्तर प्रदेशातील अलाहाबादजवळील कुत्तुपूर या छोट्याशा खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा ते भारताचा पाचवा हिंदकेसरी अशी दीनानाथ सिंह यांच्या वाटचालीची प्रेरणादायी कथा आहे. त्यांनी हिंदकेसरी हा किताब जिंकून रविवारी (दि.२८ मार्च) ला ५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्त त्यांचे आत्मचरित्र ‘लाल माती’ या नावाने शनिवारी, २७ रोजी कुस्तीप्रेमींच्या भेटीला येत आहे.
जन्म उत्तर प्रदेशचा. त्यामुळे भय्या लोक अशी ओळख, म्हशीचा तबेला आणि दुग्ध व्यवसाय हा पिढीजात व्यवसाय; परंतु दीनानाथ सिंह यांनी ही ओळख पुसून लाल मातीचा फड रंगवला. महाराष्ट्राच्या कुस्तीच्या इतिहासात दखल घ्यावी असा काळ त्यांनी गाजवला. धिप्पाड शरीरयष्टी असलेला हा माणूस तितकाच मनानेही जिंदादिल व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आहे. महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरीसह भारत मल्ल केसरी असे किताब त्यांनी जिंकले. आजही त्यांचे लालमातीशी नाते आहे. कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत दीनानाथ सिंह यांची जडणघडण झाली. जन्माने उत्तर प्रदेशातील असले तरी त्यांची कर्मभूमी कोल्हापूरच ठरली. कुस्तीतील उत्तुंग कर्तृत्वाने त्यांनी कोल्हापूरला मोठे केले व कोल्हापूरनेही त्यांना या मातीचा गंध कपाळी लावून मोठेपण दिले. नागपूरला २३ ते २८ मार्च १९७१ दरम्यान हिंदकेसरी स्पर्धा झाल्या. चिटणीस पार्कशेजारी ही स्पर्धा झाली. विदर्भवीर जांबुवंतराव धोटे, लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा व क्रीडामंत्री शेषराव वानखडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. या स्पर्धेसाठी देशभरातून मल्ल आले होते. हिंदकेसरीची अंतिम लढत बिहारचा मल्ल लालबहाद्दर सिंग याच्याशी झाली. पंधरा मिनिटे जोरदार कुस्ती झाली. कारण लालबहाद्दरही तगडा मल्ल होता. दीनानाथ सिंह यांनी त्याला ढाक डावावर चीतपट करून ही लढत जिंकली. तो दिवस होता २८ मार्च १९७१. या आठवणी या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याने ताज्या झाल्या.
हिंदकेसरीला मिळे ५० रुपये मानधन...
कुस्ती जिंकल्यावर दीनानाथ सिंह यांची नागपुरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. लोकांनीही आनंदाने १, २, व ५ रुपये बक्षीस दिले. त्यातूनही मोठी रक्कम जमा झाली होती. हिंदकेसरीच्या मल्लास त्यावेळी मानाची चांदीची गदा व गळ्यात हिंदकेसरी असे लिहिलेला जरीचा पट्टा एवढेच बक्षीस मिळे. पाच दिवस स्पर्धा चाले त्यामुळे रोजचे दहा रुपये असे ५० रुपये रोख मानधन. हिंदकेसरी या किताबापुढे अन्य काहीही बक्षीस गौण ठरावे असा तो काळ होता..
प्रकाशन समारंभ आज..
‘लाल माती’ या आत्मचरित्राचे प्रकाशन शनिवार, दि.२७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता शाहू स्मारक भवनात होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होत आहे. लोकमत, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ व ग्रंथाली प्रकाशन मुंबईतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
फोटो : २६०३२०२१-कोल-दीनानाथ सिंह०१
नागपूरला चिटणीस पार्कशेजारी झालेल्या लढतीत कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचे मल्ल दीनानाथ सिंह यांनी बिहारच्या लालबहाद्दर सिंग याला ढाक डावावर चीतपट करून २८ मार्च १९७१ ला हिंदकेसरीचा किताब पटकावला तोच हा सुवर्णक्षण..
दीनानाथ सिंह -०२
हिंदकेसरीची गदा व पट्ट्यासह तगडे दीनानाथसिंह