शिरोळमध्ये होणार ‘गोकुळ’ची मिनी डेअरी
By Admin | Updated: August 24, 2014 00:43 IST2014-08-24T00:43:13+5:302014-08-24T00:43:26+5:30
दिलीप पाटील यांची माहिती : साडेचोवीस कोटी रुपये खर्च; मुख्यमंत्र्यांकडून साडेबारा कोटींचे अनुदान

शिरोळमध्ये होणार ‘गोकुळ’ची मिनी डेअरी
कोल्हापूर : शिरोळसह मिरज तालुक्यातील अपेक्षित दूध संकलनाच्या पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’ दूध संघातर्फे शिरोळ येथे एक लाख लिटर विस्तारक्षम व एक लाख लिटर प्रतिदिन क्षमतेच्या दुधावर प्रक्रिया करणारी मिनी डेअरी (सॅटेलाईट डेअरी) उभारण्यात येत आहे. त्यासाठी २४ कोटी ६७ लाख रुपये खर्च असून, त्यांपैकी १२ कोटी ३६ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे, अशी माहिती अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, शिरोळ, मिरजसह कर्नाटकातील संस्थांकडून सुमारे एक लाख लिटर दूध संघाकडे येते. त्यापैकी ६० ते ७० हजार लिटर दूध हे शिरोळ शीतकरण केंद्र येथे व ३० ते ४० हजार लिटर दूध गोकुळ प्रकल्पाकडे येते. या भागातील अपेक्षित संकलन पाहता संघाने एक लाख लिटर विस्तारक्षमतेची सॅटेलाईट डेअरी उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याचे काम इंडियन डेअरी मशिनरी कॉर्पोरेशन, आणंद या संस्थेला मार्च महिन्यात दिले. प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी अनुदान दिल्याने संघासमोरील अडचणी दूर होऊ शकल्या. या प्रकल्पामध्ये संघामार्फत शीतकरण प्रक्रिया, दूध प्रमाणीकरण, दूध पॅकिंग व साठवणूक अशी व्यवस्था मूळ प्रकल्पासारखीच केली आहे. त्यामुळे पुन्हा प्रक्रियेसाठी दूध गोकुळ प्रकल्प येथे न आणता मुंबई, पुणे, सांगली, आदी ठिकाणी वितरीत करता येईल. हा प्रकल्प २०१५ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. संघास सात लाख लिटर क्षमतेच्या दुग्धशाळा विस्तारीकरणासाठी काही प्रकल्पांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेखाली अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. याचा एकूण खर्च २४ कोटी ९० लाख रुपये असून, त्यापैकी अनुदान १२ कोटी ४५ लाख इतके आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे.
तसेच टेबल बटर पॅकिंग यंत्रणा व तूप पॅकिंग यंत्रणा यासाठी आवश्यक आर्थिक साहाय्य प्राप्त झाले आहे. तसेच दह्याच्या पूर्वीच्या पायलट प्रकल्प क्षमतेमध्ये वाढ करून पाच टन प्रतिदिन क्षमतेचे दही उत्पादन व पॅकिंग क्षमता निर्माण करण्याचा मानस आहे. नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘रेशन बॅलेन्सिंग’ यंत्रणा कार्यान्वित केली. यााठी प्रत्येक गावासाठी स्वयंसेवकांच्या नेमणुका केल्या. त्यांना संघाने लॅपटॉप व त्यामध्ये सॉफ्टवेअर फीडिंग करून दिले आहे. त्यानुसार त्यांनी त्या गावात जाऊन जनावरांची संपूर्ण माहिती घेऊन ती सॉफ्टवेअरमध्ये भरायची आहे. २०० गावांत ही यंत्रणा कार्यान्वित आहे. गणेशोत्सव काळात १२०० गावांत ही यंत्रणा नेण्याचे व ४० हजार जनावरांची माहिती घेण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक दूध उत्पादक शेतकरी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संघाच्या सर्व्हरशी जोडला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी अध्यक्षांपर्यंत पोहोचतील. त्यातून संबंधितांना न्याय देऊ. (प्रतिनिधी)