‘गोकुळ’ ऑक्सिजन प्रकल्पपूर्तीस चार महिने लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:11+5:302021-05-09T04:24:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या नियोजित ऑक्सिजन प्रकल्पपूर्तीस किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ऑनलाईन प्रकल्पासाठी ...

‘गोकुळ’ ऑक्सिजन प्रकल्पपूर्तीस चार महिने लागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या नियोजित ऑक्सिजन प्रकल्पपूर्तीस किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ऑनलाईन प्रकल्पासाठी ६०० चौरस फूट जागा लागणार असून त्यासाठी ४५ लाख खर्च अपेक्षित आहे. याबाबत नवनिर्वाचित संचालक मंडळाची १७ मे रोजी बैठक होत असून यामध्ये मंजुरी दिली जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा आहे. कोल्हापुरात रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने सामाजिक बांधीलकी म्हणून ‘गोकुळ’ने यापूर्वीच ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकीमुळे ही प्रक्रिया थांबली होती. नवनिर्वाचित संचालकांच्या बोलावलेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी ऑक्सिजन प्रकल्प तातडीने उभा करण्याच्या सूचना दिल्या. शनिवारी नूतन संचालकांनी ‘गोकुळ’च्या कार्यालयात प्रवेश केला. त्यामध्ये यावर चर्चा झाली. याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करण्याची सूचना संघाच्या संबंधित यंत्रणेला दिली आहे.
‘गोकुळ’ची अध्यक्ष निवड शुक्रवारी (दि. १४) होत आहे. त्यानंतर संचालक मंडळाची पहिली बैठक १७ मे रोजी होत आहे. यामध्ये ऑक्सिजन प्रकल्पावर सविस्तर चर्चा होणार आहे. हा प्रकल्प ऑनलाईन केला तर त्यासाठी अधिक गुंतवणूक होणार आहे. तो कणेरी मठ की कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलच्या आवारात सुरू करायचा, यावरही संचालकांना निर्णय घ्यावा लागणार आहे. प्रकल्पासाठी ६०० चौरस फूट जागा लागणार असून ४५ लाख खर्च अपेक्षित आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी अधिक आहे. तीन-चार महिन्यांनंतर लाट ओसरल्यानंतर ऑक्सिजन विक्रीची व्यवस्था करावी लागेल, त्याचा उत्पादन खर्च, मागणी आणि दर हे पाहणेही गरजेचे आहे.
या प्रकल्पाचे इस्टिमेट करण्याच्या सूचना संचालकांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकारी १७ मे रोजीच्या बैठकीत सविस्तर प्रस्ताव सादर करणार आहेत.
नवीन संचालकांना दूध प्रकल्पाची माहिती देणार
सत्तारूढ १७ पैकी तब्बल १४ संचालक ‘गोकुळ’मध्ये पहिल्यांदाच आले आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर त्यांना संपूर्ण दूध प्रकल्पाची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर विभाग प्रमुखांसोबत त्यांची बैठक होणार आहे.