आरक्षित प्रभागांमुळे अनेकांची गोची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:26+5:302020-12-22T04:23:26+5:30
रमेश पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा: कसबा बावड्यातील सहाही प्रभाग खुले झाले असले तरी बावड्यातील ४ प्रभाग सर्वसाधारण ...

आरक्षित प्रभागांमुळे अनेकांची गोची
रमेश पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा:
कसबा बावड्यातील सहाही प्रभाग खुले झाले असले तरी बावड्यातील ४ प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांची गोची झाली आहे. शुगरमिल ते पोलीस लाईन या परिसरात असलेले सहाच्या सहा प्रभाग खुले झाले आहेत. मात्र, या सहा प्रभागांपैकी चार प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
प्र. क्र. १ शुगर मिलचे सुभाष बुचडे, प्र. क्र. २ कसबा बावडा पूर्वचे श्रावण फडतारे, प्र. क्र. ३ हनुमान तलावचे डॉ. संदीप नेजदार, प्र. क्र ४ च्या माधुरी माधुरी लाड, प्र. क्र. ५ लक्ष्मीविलास पॅलेसचे अशोक जाधव व प्र. क्र. ६ पोलीस लाईनमधून स्वाती यवलुजे या मातब्बरांना आरक्षणाचा झटका बसला आहे.
नव्या प्रभाग रचनेत शुगर मिल प्रभाग १ हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला असल्याने विद्यमान नगरसेवक सुभाष बुचडे यांचा पत्ता कट झाला आहे. आपण गेली पंचवीस वर्षे विविध प्रभागांचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे आता आपण इतर कोणत्याही प्रभागातून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनीही स्पष्ट केले. प्र. क्र. २ कसबा बावडा पूर्व हा प्रभागही सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने श्रावण फडतरे यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. प्रभाग क्र. ३ कसबा बावडा हनुमान तलाव हा डॉ. संदीप नेजदार यांचा प्रभाग. हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने ते आपली पत्नी डॉ. सरोज किंवा आई लक्ष्मीबाई नेजदार यांना निवडणुकीत पुढे आणण्याचा प्रयत्न करतील.
प्रभाग क्रमांक ४ बावडा पॅव्हेलियन हा सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्याने या प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी होणार आहे. विद्यमान स्वीकृत नगरसेवक मोहन सालपे, नगरसेविका माधुरी लाड यांचे पती संजय लाड तसेच सचिन पाटील, आप्पा कुंभार, सचिन चौगले हे या प्रभागातून आपले नशीब आजमावण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक ५, लक्ष्मीविलास पॅलेस हा प्रभागही सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने विद्यमान नगरसेवक अशोक जाधव यांची गोची झाली आहे. त्यांचा मुलगा अभिजीत यांनी या प्रभागातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली होती. हा प्रभाग मूळ गावठाणात येत असल्याने या प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या बावड्यात सर्वात जास्त असणार आहे. परिवहन समितीचे माजी सभापती अजित पवार हे आपल्या घरातील कोणाला तरी या निवडणुकीत उतरवतील.
प्रभाग क्र ६ पोलीस लाईन हा सर्वसाधारण गटासाठी खुला झाला आहे. माजी महापौर स्वाती यवलुजे यांचे पती सागर यवलुजे, सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विनायक कारंडे, निवास जाधव, माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे हे या निवडणुकीच्या रिंगणात असतील.
चौकट: सर्वांनाच हवी सतेज पाटील गटाची उमेदवारी...
कसबा बावडा हा पालकमंत्री सतेज पाटील यांचा बालेकिल्ला. मागील निवडणुकीत आमदार नसताना ऋतुराज पाटील यांनी बावड्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन बावड्यामध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आताही या निवडणुकीसाठी बावड्यातील बहुसंख्य इच्छुक उमेदवारांना काँग्रेसची म्हणजेच पालकमंत्री सतेज पाटील गटाची उमेदवारी हवी आहे. काँग्रेसची ही जमेची बाजू आहे.