‘एमआयडीसी’तील उद्योजक न्यायालयात जाणार
By Admin | Updated: June 14, 2015 01:52 IST2015-06-14T01:52:00+5:302015-06-14T01:52:00+5:30
‘स्मॅक’चा निर्णय : टाऊनशिपसाठी प्रयत्न

‘एमआयडीसी’तील उद्योजक न्यायालयात जाणार
शिरोली : महापालिका हद्दवाढ विरोधात न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्णय शिरोली आणि गोकुळ शिरगाव येथील उद्योजकांनी ‘स्मॅक’मध्ये झालेल्या बैठकीत घेतला. हद्दवाढ विरोधात आंदोलन उभारण्यासाठी बैठक आयोजित केली होती.
महापालिकेला उत्पन्न वाढविण्यासाठी औद्योगिक वसाहतींचा हद्दवाढीत समावेश करावयाचा आहे. याउलट औद्योगिक वसाहती महापालिकेत समाविष्ट झाल्यावर या भागातून निवडून जाणाऱ्या दोन-चार नगरसेवकांचा त्रास उद्योजकांना वाढणार आहे आणि औद्योगिक वसाहतीत मतदान नसल्याने संबंधित लोकप्रतिनिधी या भागाकडे लक्षही देणार नाहीत आणि सुविधाही मिळणार नाहीत. करात भरमसाठ वाढ होणारच, पण नागरी वस्तीत हवा, पाणी, ध्वनिप्रदूषणाच्या नावाखाली उद्योजकांना महापालिका वारंवार वेठीस धरणार.
शिरोली आणि गोकुळ-शिरगाव औद्योगिक वसाहतीला गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र टाऊनशिपची मागणी आहे. त्यासाठी शासनाकडे तत्काळ पाठपुरावा करायचा, हद्दवाढ नको टाऊनशिप मंजूर करून द्यावी यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरले. हद्दवाढ विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करायची, असाही निर्णय झाला.
यावेळी ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, गोशिमा अध्यक्ष अजित आजरी, उपाध्यक्ष राजू पाटील, संजय उरमनटी, संचालक सचिन पाटील, देवेंद्र ओबेरॉय, आर. पी. पाटील, रामराजे बदाले, देवेंद्र दिवाण, श्रीकांत पोतनीस, शाम मिरजे, दिलीप चरणे, बी. पी. जाधव, पवन रोलचंदाणी, शेखर कुसळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)