विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना संधी द्या
By Admin | Updated: April 8, 2015 00:27 IST2015-04-07T23:53:45+5:302015-04-08T00:27:05+5:30
अशोक भोईटे : शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती समारंभात प्राचार्यांचा गुणगौरव

विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना संधी द्या
कोल्हापूर : गुणवत्ता केवळ अभ्यासात मोजली जाऊ नये. विद्यार्थ्यांतील सुप्तगुणांचे प्रभावी प्रकटीकरण होणे म्हणजे गुणवत्ता. ते बलवान नागरिक घडविण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्राचार्य, प्राध्यापकांनी त्यादृष्टीने कार्यरत राहून विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाची संधी विविध उपक्रमांतून उपलब्ध करून द्यावी, शिवाय विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा उपयोग करून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी मंगळवारी येथे केले.
येथील केआयटी कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘केआयटी’चे अध्यक्ष सचिन मेनन, तर सचिव साजिद हुदली, विश्वस्त सुनील कुलकर्णी, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.याप्रसंगी शहरी विभागातून डॉ. हिंदुराव पाटील (विवेकानंद महाविद्यालय), कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे (शिवाजी विद्यापीठ), एन. व्ही. नलवडे (न्यू कॉलेज). निमशहरी : पी. व्ही. कडोले (डीकेटीई कॉलेज, इचलकरंजी), एम. एस. शिंदे (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा). ग्रामीण विभाग : व्ही. व्ही. कार्जिनी (केआयटी कॉलेज), एस. वाय. होनगेकर (राजे रामराव महाविद्यालय, जत) यांचा सत्कार करण्यात आला.प्रभारी कुलगुरू डॉ. भोईटे म्हणाले, पुस्तकी शिक्षक हे ५० टक्के काम करते. उर्वरित काम हे व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे. त्यादृष्टीने प्राचार्य, प्राध्यापकांनी कार्यरत राहावे. विद्यार्थ्यांत सामाजिक बांधीलकीची भावना निर्माण करणे शिक्षकांची जबाबदारी आहे. अध्यक्ष मेनन म्हणाले, गुणवत्तेची एकके सध्या बदललेली आहेत. ते लक्षात घेऊन स्पर्धात्मक युगात टिकून राहणारे विद्यार्थी घडविण्यावर अधिक भर देणे काळाची गरज आहे. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते शहरी, निमशहरी, ग्रामीण विभागातील गुणवत्ता शिष्यवृत्तीप्राप्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. रसिका देऊसकर यांनी पसायदान सादर केले. केआयटीचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी यांनी स्वागत केले. प्रा. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. एम. एम. मुजुमदार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
समारंभाचा खर्च विद्यापीठ देणार
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील म्हणाले, शिष्यवृत्तीत १४ वर्षे विवेकानंद कॉलेज अव्वल आहे. कला, क्रीडा, युवा महोत्सवातही आम्ही आघाडीवर आहोत. पण, आम्हाला कायमस्वरूपी संलग्नता मिळविण्यासाठी ४० वर्षे लागली. मोठ्या महाविद्यालयांना विद्यापीठाची सापत्नभावाची वागणूक मिळते. शिष्यवृत्ती समारंभाचे प्रमाणपत्र मराठीत मिळते; पण ते ‘नॅक’च्या समितीला समजत नाही. त्यामुळे ते मराठी व इंग्रजीत मिळावे. शिष्यवृत्ती समारंभाचा सर्व खर्च आयोजक महाविद्यालय करते. हा खर्च विद्यापीठाने द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. प्राचार्य एस. वाय. होनगेकर म्हणाले, शिष्यवृत्तीबाबत पारंपरिक आणि व्यावसायिक महाविद्यालयांचे स्वतंत्र गट करावेत. त्यावर प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे म्हणाले, या समारंभासाठी महाविद्यालयांना येणारा खर्च विद्यापीठ देईल. प्रमाणपत्र मराठी व इंग्रजी दिले जाईल.