शिरोलीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:19+5:302021-02-05T07:08:19+5:30
शिरोली : शिरोलीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्यावा, अशी मागणी महाडिक गटाच्यावतीने गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात ...

शिरोलीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्या
शिरोली : शिरोलीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्यावा, अशी मागणी महाडिक गटाच्यावतीने गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी मोकाशी यांनी, लवकरच नवीन कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देऊ, असे आश्वासन दिले.
गेल्या तीन वर्षांत शिरोली ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळाला नसल्याने विकासकामे खोळंबली. अभ्यासू ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांनाच मुदतवाढ मिळावी, यासाठी शाहू आघाडीने प्रयत्न केले; मात्र कठारे यांची नागावमध्ये बदली झाली. त्यानंतर एम. आर. पाटील यांनी पदभार स्वीकारला; मात्र त्यांच्या कार्यप्रणालीवर आघाडी नाराज होती. अशोक मुसळे यांनी काही दिवस पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेत सत्तांतर होताच आघाडीने पुन्हा कठारे यांना आणले;
मात्र एकाच अधिकाऱ्याची पुन्हा त्याच ग्रामपंचायतीत नेमणूक करता येत नसल्याने कठारे यांची प्रशासनाने बदली केली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आर. सी. पाटील यांनी पदभार स्वीकारला. मात्र, त्यांनीही रजा टाकून बदलीसाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. गेल्या तीन वर्षांत पाच ग्रामविकास अधिकारी आले आणि गेले. यामुळे गावातील सुरू असलेल्या विकास कामांना "खो" बसला आहे. तसेच नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शिरोली ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्यावा अशी मागणी महाडिक गटाचे ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, प्रकाश कौंदाडे, सलीम महात, बाबासाहेब कांबळे, विनायक कुंभार, पुष्पा पाटील, मीनाक्षी खटाळे, संध्याराणी कुरणे, श्वेता गुरव यांनी केली.