करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थिनींना शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर अचानक उलट्या व जुलाब सुरू झाल्याने त्यांना तत्काळ कोतोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व मुलींची प्रकृती स्थिर व सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप रेवडेकर यांनी सांगितले.सातवी व सहावीमध्ये शिकणाऱ्या सहा मुलींना शालेय पोषण आहार खाल्ल्यामुळे जुलाब व उलट्या सुरू झाल्या. त्यांना तातडीने कोतोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. माळवाडी शाळेची सुमारे १७० पटसंख्या आहे. इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या कल्याणी अनिल चौगुले तसेच इयत्ता सहावीमध्ये शिकत असणाऱ्या स्वरांजली संजय खोत, श्रावणी राहुल खलासे, संस्कृती युवराज सागावकर, संयमी संजयसिंह गायकवाड, संचिता सागर चौगुले या सहा मुलींनी सर्वांच्या बरोबर सकाळी शालेय पोषण आहार खाल्ला पण त्यातील फक्त सहा मुलींनाच जुलाब व उलट्या सुरू झाल्या.
त्यानंतर संबंधित शिक्षकांनी त्यांना उपचारासाठी कोतोली आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले पण संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षकांनी कोणतीही कल्पना न देता रुग्णालयात दाखल केल्याचे पालकांनी सांगितले. जेव्हा पालक आरोग्य केंद्रात आले तेव्हा शिक्षकांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. विद्यार्थिनींना निकृष्ट जेवण दिले जात असल्याबद्दल पालकांनी वेळोवेळी शाळेकडे तक्रार करून देखील शिक्षक आणि व्यवस्थापन समिती दुर्लक्ष करीत असल्याचे पालकांनी सांगितले. अनेक वेळा जेवणात अळ्या आणि टोके सापडत असल्याचे शिक्षकांना निदर्शनास आणून दिल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.आरोग्य अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांनी अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. विद्यार्थिनींची तब्येत आता सुधारत असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डाॅ. रेवडेकर यांनी सांगितले. शालेय पोषण आहार व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आल्याचे यावेळी सांगितले.