मुलीवर बलात्कार; तिघांना कोठडी
By Admin | Updated: July 9, 2014 00:53 IST2014-07-09T00:53:25+5:302014-07-09T00:53:25+5:30
सात दिवसांची पोलीस कोठडी

मुलीवर बलात्कार; तिघांना कोठडी
कोल्हापूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून मागासवर्गीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तिघा संशयित आरोपींना करवीर पोलिसांनी आज, मंगळवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संशयित पंकज मधुकर पाटील (वय २४), सरदार बळवंत पाटील (२६), सागर कृष्णात पाटील (२५, सर्व रा. कुरुकली, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. आणखी चौथा संशयित कुमार हा पसार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
गावातीलच एका अल्पवयीन मुलीला पंकज पाटील याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्याची माहिती मित्र सरदार, सागर व कुमार या तिघांना समजताच त्यांनी पीडित मुलीला याबाबत घरी सांगण्याची भीती घालत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. हा त्रास असह्य झाल्याने तिने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर नातेवाईक काल, सोमवारी रात्री करवीर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांची भेट घेऊन संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पीडित तरुणीही पोलीस ठाण्यात आली होती.
दरम्यान, याची कुणकुण संशयित तरुणांना लागताच त्यांनी प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. करवीर पोलीस ठाण्यासमोर दोन्ही बाजूंकडील लोक थांबून होते. रात्री साडेदहाच्या सुमारास अखेर पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी प्रियकर पंकज पाटील, सरदार पाटील, सागर पाटील यांना तत्काळ अटक केली, तर कुमार (पूर्ण नाव समजलेले नाही) हा पसार झाला.
या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना घटनास्थळी फिरविले. मुलीवर ज्या ठिकाणी बलात्कार केला त्याची पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)