युद्धाचे घाव.. रक्त सळसळणारं कोल्हापुरातील सैनिक गिरगाव; गावात १३१ माजी सैनिक तर सद्या ८१ जण बॉर्डरवर

By पोपट केशव पवार | Updated: May 10, 2025 12:48 IST2025-05-10T12:48:43+5:302025-05-10T12:48:59+5:30

गावात देशप्रेमाने भारावलेले वातावरण

Girgaon is known as a military village in Kolhapur; 131 ex servicemen live in the village while 81 are currently on the border | युद्धाचे घाव.. रक्त सळसळणारं कोल्हापुरातील सैनिक गिरगाव; गावात १३१ माजी सैनिक तर सद्या ८१ जण बॉर्डरवर

युद्धाचे घाव.. रक्त सळसळणारं कोल्हापुरातील सैनिक गिरगाव; गावात १३१ माजी सैनिक तर सद्या ८१ जण बॉर्डरवर

पोपट पवार

कोल्हापूर : गाव सैनिक गिरगाव..वेळ दुपारी एकची..सूर्य आग ओकत असल्याने गावात संचारबंदी असल्यासारखं वातावरण.. मात्र, एका छोट्याशा कौलारू घरात एक आजोबा आत-बाहेर सारख्या येरझऱ्या घालत भारत-पाकिस्तान युद्धाचे काय झाले, म्हणून येणाऱ्या-जाणाऱ्यांना विचारत होते. ‘अरे पाकड्यांच्या घरात तीन-तीन मैल मी आतमध्ये शिरलोय, आता सरकारने पुन्हा संधी दिली, तर पुन्हा सीमेवर जाऊन लढेन, इथं उन्हात तळपण्यापेक्षा सीमेवर तळपलेलं कधीबी चांगलंच की, म्हणत त्या आजोबांनी वयाच्या ८४ व्या वर्षीही मी देशसेवा करायला तयार असल्याचा संदेश दिला. 

दत्तात्रय रामचंद्र पाटील, असे या आजोबांचे नाव. सैन्याची पूर्वापार परंपरा असलेल्या या गावात, असे शंभरहून अधिक दत्तात्रय पाटील सीमेवर जाऊन लढायला तयार आहेत. ज्यांच्यामुळे आमच्या कैक आया-बहिणींचे कुंकू पुसले त्यांना कायमचा धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे सरकारला गरज पडली, तर पुन्हा सीमेवर जाऊन पाकला कायमचे नेस्तनाबूत करू, या शब्दांत दत्तात्रय पाटील, शशिकांत साळोखे, किसन जाधव या माजी सैनिकांनी मनामनाचे आक्रंदन उलगडले.

भारत-पाक युद्धाने उभा देश एकसंघ झाला असताना, सैनिक गिरगावसारखे देशप्रेमाने भारावलेले गाव, तर त्याला कसे अपवाद असेल. या गावात १३१ माजी सैनिक असून, सध्या जम्मू-काश्मीर, राजस्थान या पाकच्या सीमेवर याच गावातले तब्बल ८१ सैनिक डोळ्यात तेल घालून शत्रूचा सामना करत आहेत. पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू झाल्यापासून, तर माजी सैनिकांचे रक्त सळसळत आहे. कार्यरत ८१ सैनिकांमधील बहुतांशजण सीमेवरच असल्याने त्यांच्याबद्दलची माहिती माजी सैनिकांबरोबरच त्यांच्या कुटुंबाकडूनही रोज घेतली जाते. शिवाय, आजी-माजी सैनिक एकत्र येऊन युद्धाच्या घडामोडीवर सकाळ-संध्याकाळ चर्चा करतात.

दोन गोळ्या लागूनही जोश कायम

१९७१ च्या बांग्लादेश-पाक युद्धात भारत बांगलादेशकडून लढाईत उतरला होता. याच लढाईत कर्तृत्व गाजवलेले दत्तात्रय पाटील यांचा जोश आजही वाखणण्यासारखा आहे. या लढाईत पाटील यांच्या गुडघ्या व खांद्यातून दोन गोळ्या आरपार गेल्या. पण, ते मागे हटले नाहीत. १९६५ च्या युद्धातही तब्बल तीन मैल पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन टेहळणी केल्याची आठवण ते अभिमानाने सांगतात.

काय आहे गावचा इतिहास ?

या गावाला मोठी सैन्यपरंपरा आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यावेळी कोल्हापूरच्या चिमासाहेब महाराजांना इंग्रजांनी भवानी मंडपात कैद केले होते. त्यांना सोडवण्यासाठी गिरगावमधून फिरंगोजी शिंदे यांनी ५०० सहकाऱ्यांसह कोल्हापुरात येत इंग्रजांशी लढा दिला. यात फिरंगोजी यांना वीरमरण आले. त्यांचे स्मारक गावात उभे करण्यात आले आहे, तेव्हापासून या गावाला सैनिकी परंपरा आहे.

आमच्या गावाला सैनिकांची मोठी परंपरा आहे. आमचा देश आणि सैनिक हाच आमचा आत्मा आहे. सध्या युद्धाच्या काळात देशाला गरज पडली, तर सर्वच्या सर्व १३१ माजी सैनिक पुन्हा सीमेवर जाऊन लढायला तयार आहेत. - शशिकांत साळोखे, निवृत्त सुभेदार.

Web Title: Girgaon is known as a military village in Kolhapur; 131 ex servicemen live in the village while 81 are currently on the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.