घाटगेंच्या निर्णयाने कागलच्या राजकारणात फरक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:39+5:302021-02-05T07:08:39+5:30
(संजय घाटगे व समरजित घाटगे यांचे फोटो वापरावेत) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : माजी आमदार संजय घाटगे यांनी विधानसभा ...

घाटगेंच्या निर्णयाने कागलच्या राजकारणात फरक नाही
(संजय घाटगे व समरजित घाटगे यांचे फोटो वापरावेत)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : माजी आमदार संजय घाटगे यांनी विधानसभा निवडणूक पुन्हा लढवणार नाही, या जुन्याच घोषणेचा पुनरुच्चार केला असला तरी त्यामुळे कागल तालुक्याच्या राजकारणात तूर्त फारसा फरक पडण्याची चिन्हे नाहीत. दोन्ही घाटगे जोपर्यंत विश्वासाने व एकदिलाने एकत्र येत नाहीत तोपर्यंत नवे काही घडण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, साखर कारखान्यासह अन्य निवडणुकीत सोयीनुसार संजय घाटगे गटाची भूमिका निश्चित होईल.
माजी आमदार संजय घाटगे यांनी बाचणी (ता. कागल) येथे शनिवारी भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे दुसऱ्यांदा जाहीर केले. त्यांनी गेल्यावेळेच्या निवडणुकीतही आपली ही शेवटचीच निवडणूक असल्याने गुलाल द्यावा, असे भावनिक आवाहन केले होते. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी आतापर्यंत पाचवेळा निवडणूक लढवली व त्यात त्यांना एकदाच ११ महिन्यांची आमदारकी मिळाली. फारशी सत्ता नसतानाही गट टिकवून ठेवण्यात मात्र ते यशस्वी झाले आहेत. खरेतर गेल्या निवडणुकीतच त्यांनी थांबून अंबरिश घाटगे यांनी विधानसभा लढवावी, असा कार्यकर्त्यांत सूर होता. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवणार नाही म्हटले, त्यात नवीन काही नाही. नवीन हेच आहे की, त्यांनी विधानसभेच्या रणांगणातून माघार घेतल्यावर कुणाच्या पाठीशी राहणार हे मूळचा घाटगे एकत्र येऊन पुढील राजकारण होणार असेल तर त्यांच्या माघार घेण्याला फारच महत्त्व आहे. परंतु, तसे चित्र दिसत नाही. कारण, संजय घाटगे व समरजित घाटगे यांच्यात मनोमिलन नाही. परस्परांबद्दल विश्वासाचे वातावरण नाही. विधानसभेला शिवसेनेची उमेदवारी मला मिळाली असल्याने समरजित यांनी बंडखोरी न करता थांबावे व आपल्याला पाठिंबा द्यावा, असे संजय घाटगे यांना वाटत होते. परंतु, समरजित यांनी विधानसभेची तयारी केली होती. पक्षाने त्यांना उमेदवारीही देण्याचे कबूल केले होते. त्यामुळे आता माघार नाही, या भूमिकेतून त्यांनी निवडणूक लढवली व त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची ९० हजार मते मिळवली. आताही तालुक्याच्या राजकारणात तीन प्रमुख गटांच्या विरोधात ते लढत आहेत. त्यामुळे पुढील विधानसभाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशीच होऊ शकते. तशी संजय घाटगे यांना या लढतीत विजयाची स्पेस नव्हतीच, त्यामुळे त्यांनी त्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला, हे चांगलेच झाले. आता कारखाना उभारणीतून ते गट मजबूत करण्यावर लक्ष देऊ शकतील.
विधानसभेबाबत अजून संभ्रम..
संजय घाटगे यांचे राजकीय वारसदार अंबरिश घाटगे हे सध्या गोकुळ दूध संघाचे संचालक आहेत. जिल्हा परिषदेतही त्यांना सत्ता मिळाली आहे. नुसतेच वैरत्व पत्करून हाती काही लागत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. विरोधात राहिलो तर सत्ताही नाही व कामेही होत नाहीत. त्यामुळे या गटाची कामे सध्या मुश्रीफ यांच्या माध्यमातून होत आहेत. विधानसभा अजून तशी लांब आहे. परंतु, त्यावेळी स्थिती कशी निर्माण होते यावर अंबरिश घाटगे यांचा विधानसभा लढवण्याचा निर्णय अवलंबून असेल.