घाटगे गटाची स्थिती 'युद्धात जिंकले आणि तहात हरले'

By Admin | Updated: November 10, 2016 00:15 IST2016-11-10T00:02:05+5:302016-11-10T00:15:59+5:30

मुरगूडला एका जागेसाठी ढीगभर इच्छुक : समरजितसिंह घाटगे यांचा आश्चर्यकारक निर्णय

Ghatge group status 'wins in war and loses' | घाटगे गटाची स्थिती 'युद्धात जिंकले आणि तहात हरले'

घाटगे गटाची स्थिती 'युद्धात जिंकले आणि तहात हरले'

अनिल पाटील--- मुरगूडमध्ये ‘कमळ’ फुलविणारच, अशी घोषणा करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेले समरजितसिंह घाटगे यांनी औपचारिक एक जागा लढविण्याचा घेतलेला निर्णय अनेक स्थानिक कार्यकर्त्यांना रुचलेला नाही. कागलमधील सत्तेसाठी मुरगूडमधील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा निर्णय नक्कीच आश्चर्यकारक आहे. त्यामुळे जोमात असणाऱ्या मुरगूडमधील घाटगे गटाची परिस्थिती ‘युद्धात जिंकलो आणि तहात हरलो’ अशीच झाली आहे. अर्थात या निर्णयामध्ये भविष्याचा सारासार विचार दडलेला असला तरी युद्धपातळीवर नगरपालिका निवडणुकीची तयारी केलेल्या उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे. वाट्याला आलेली एका जागेवर उमेदवारी कोणाला द्यावयाची, असा जटिल प्रश्नही निर्माण झाला आहे
मुरगूड शहराचा विचार करता गेल्या अनेक वर्षांपासून प्रामुख्याने याठिकाणी प्रबळ असणारे पाटील गट आणि मंडलिक गट या दोघांमध्येच अटीतटीचा सामना होत आहे. पक्षाला या शहरामध्ये आतापर्यंत फारसे महत्त्व आले नव्हते; पण या दोन गटांना सत्तेचा लंबक गाठण्यासाठी घाटगे गटाशी किंवा मुश्रीफ गटाशी हातमिळवणी करावीच लागते. त्यामुळेच आतापर्यंत जुन्याजाणत्या लोकांचा मुरगूडमधील घाटगे गट हा निर्णायक भूमिका नेहमीच बजावत आला आहे. यावेळीही या गटाची बांधणी काकणभर सरस झाली होती, हे नक्की; कारण सहकारातील आदर्श विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर समरजित यांनी धडाक्याने लोकसंबंध वाढवला. अर्थात याला राजकीय किनार नव्हती; पण त्याचा फायदा त्यांना मुरगूडच्या पालिका निवडणुकीमध्ये झाला असता, कारण एकेकाळी मुरगूडच्या सर्व प्रभागांमध्ये उमेदवारही मिळणार नाहीत, अशी टीका घाटगे गटावर होत असताना यावेळी मात्र यांच्याकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे.
गेल्या वर्षभरापासूनच समरजितसिंह घाटगे यांनी मुरगूडमधील संपर्क वाढवला होता. त्याशिवाय पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही गुप्त बैठकाही झाल्या होत्या. घाटगे यांच्या भाजप प्रवेशानंतर तर कार्यकर्त्यांना नवसंजीवनीच मिळाली होती. लगेच तिसऱ्या दिवशी मुरगूडमध्ये मेळावा घेऊन मुरगूड नगरपरिषद ताकदीने लढवणार, अशी घोषणाही त्यांनी केली. यामुळे गेल्या महिन्यापासून मुरगूडमधील स्थानिक कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून १७ प्रभागांमध्ये, तसेच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार शोधून त्यांचे अर्जही दाखल केले होते. त्यामुळे या गटात चैतन्य दिसत होते. दरम्यान, कागल शहरातील युतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने मुरगूडमधील कार्यकर्त्यांना हुरहुर लागली होती; पण समरजित घाटगे यांनी मुरगूडमध्ये कागल तालुका ज्यांनी घडविला, त्यांच्या वारसांची युती होणार हे स्पष्टच केले होते. त्यामुळे मुरगूडमध्ये मंडलिक गटाबरोबरच घाटगे गट जाणार, हे नक्की होते; पण किती जागा मिळणार यावर कार्यकर्त्यांचा जीव अडला होता.
एकंदरीत वातावरणाचा अंदाज घेतला तर मुरगूडमध्ये पाटील गटाबरोबर युती करताना मुश्रीफ गटाने तब्बल पाच जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. शिवाय उपनगराध्यक्ष पदही त्यांनी मिळवले. त्यामुळे जरी घाटगे गटाची युती मंडलिक गटाबरोबर झाली तर किमान तीन जागा या गटाला मिळतील, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. दोन दिवसांपूर्वी याच तोडग्यावर ही युती अंतिम झाल्याची चर्चासुद्धा होती. यामध्ये प्रभाग तीनमधून अनंत फर्नांडिस, प्रभाग चारमधून अविनाश पाटील यांच्या सौभाग्यवती व प्रभाग पाचमधून मंगल रावण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे घाटगे गटाकडून सांगण्यात येत होते. परंतु, घाटगे गटाला एकच जागा मिळाल्यावर मात्र अनेकांचा विश्वासच बसेना. त्यामुळे अनेकांनी वृत्तपत्र प्रतिनिधींशी संपर्क करून खातरजमा करण्याचा प्रयत्न केला.



कार्यकर्त्यांवर अन्याय
मुरगूड पालिकेत ‘कमळ’ फुलविणार, असा निश्चय करणाऱ्या समरजित घाटगे यांनी कागलमधील सत्तेची सूत्रे हातामध्ये ठेवण्यासाठी मुरगूडमध्ये कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचे अनेक कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत. याबाबतची आपली भूमिका समरजित घाटगे मुरगूडमध्ये येऊन स्पष्ट करतीलच. मात्र, त्यांच्यासमोर जाऊन आपल्या व्यथा मांडण्याचं धाडस कोणताच कार्यकर्ता करणार नाही, हे नक्की! परंतु, ज्यावेळी युतीचा अंतिम निर्णय प्रसिद्धीमाध्यमांसमोर आला, त्यावर मंडलिक गटातील मुरगूडमधील स्थानिक कार्यकर्त्यांच्या नावांसह सह्या आहेत. या बैठकीला संजय मंडलिकांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन सजगता दाखवली. मग घाटगे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना या बैठकीला का बोलावले नाही? हाही प्रश्न अनुत्तरणीय आहे. मुश्रीफ गटाने उमेदवार सोडून राहिलेल्या उमेदवारांना माघार घ्यावयास लावली आहे. मंडलिक गटाचे १७ अर्जच शिल्लक आहेत; पण घाटगे गटाचीच आता माघारी राहिली आहे. त्यामुळे ३४ उमेदवारच शिल्लक राहतात की बंडखोरी होते, हे पाहण्यासाठी अजून दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Ghatge group status 'wins in war and loses'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.