कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण करून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:46 IST2021-03-13T04:46:48+5:302021-03-13T04:46:48+5:30
कोल्हापूर : कोरोनाची दाहकता कमी करण्यासाठी सर्व नागरिकांनी आपले कुटुंब, समाज, जिल्हा सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन ...

कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण करून घ्या
कोल्हापूर : कोरोनाची दाहकता कमी करण्यासाठी सर्व नागरिकांनी आपले कुटुंब, समाज, जिल्हा सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्राम समिती सदस्य यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी गतवर्षी ग्राम समित्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. पण आता शेजारच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी पुन्हा सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे. संसर्ग वाढू नये यासाठी ग्राम समित्यांनी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा वापर करण्यासाठी गावातील लोकांचे प्रबोधन करावे. विद्यार्थी विना मास्क शाळेत जाणार नाहीत, लग्न, वाढदिवस अशा सार्वजनिकरित्या कार्यक्रमात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्राम समित्यांनी यासाठी बैठका घेऊन नियोजन करावे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे यांनी विना मास्क फिरणाऱ्यावर पोलीस विभागामार्फत कारवाई केली जाईल मात्र यामागे जिल्हा कोरोनापासून सुरक्षित ठेवणे ठेवणे उद्देश असल्याचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींनी स्वत: तसेच नोंदणी केलेल्या लोकांना लसीकरण केंद्रावर पाठवून त्यांची लसीकरण पूर्ण होईल यासाठी त्यांनी आपले योगदान द्यावे, असे सांगितले.
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रभाग समित्यांनी लसीकरणाचे नियोजन करावे. रुग्ण आढळलेल्या भागात कंटेनमेंट झोन करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. खासगी हॉस्पिटलनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती प्रशासनास द्यावी अशी सूचना केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अधिष्ठाता डॉ. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, करवीरचे प्रातांधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.
लसीकरणात जिल्हा अग्रेसर ठेवा
४५ ते ६० व ६० वर्षावरील सरपंच, सोसायट्यांचे संचालक, तालमींचे कार्यकर्ते व मान्यवरांनी स्वत: लसीकरण करून घ्यावे. ज्या जिल्ह्यात या वयोगतील लोकांचे ३१ मार्चपर्यंत शंभर टक्के लसीकरण पूर्ण होईल त्या जिल्ह्यात लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरू करण्यात येणार असल्याने जिल्हा लसीकरणामध्ये अग्रेसर ठेवण्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
--
फोटो नं १२०३२०२१-कोल-लसीकरण बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली लसीकरण आढावा बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
---