जर्मन नवीन वैद्यक
By Admin | Updated: June 3, 2015 01:06 IST2015-06-03T00:28:38+5:302015-06-03T01:06:09+5:30
न्यूटनच्या नियमानुसार क्रिया व प्रतिक्रिया एकमेकांच्या विरुद्ध असतात. याचाच अर्थ रोग होतो तेव्हा तो बरा होण्याची क्रियाही शरीरात सुरू असते. क्रिया व प्रतिक्रियामधील कारण दूर व्हायला हवे.

जर्मन नवीन वैद्यक
जगाच्या इतिहासामध्ये जर्मन बुद्धिमत्तेस तोड नाही. संशोधनासह विविध क्षेत्रांमध्ये इतर देशांच्या तुलनेत जर्मनीने जास्तीत जास्त नोबेल पारितोषके पटकावली आहेत. एकदा एक जर्मनस्थित भारतीय जोडपे आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याला हवी असलेली गाडी खरेदीसाठी एका खेळण्याच्या दुकानात गेले. मुलास आवडलेली गाडी खरेदी केली. तिचे प्रात्यक्षिक दुकानातच पाहिले आणि घरी आले. घरी येताच गाडी काही चालेना. पालकांना राग अनावर झाला. त्यांनी परत दुकानात जाऊन विक्रेत्याकडे तक्रार नोंदविली. गाडी चालू करण्यासाठी त्याची किल्ली कशी वापरायची हे मुलाच्या आई-वडिलांना कळले नव्हते. विक्रेत्याने त्यांना निक्षून सांगितले की, असे होणे नाही; कारण ही गाडी जर्मन बनावटीची आहे.
होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमन हेदेखील जर्मनीचे सुपुत्र. त्यांनी सुमारे अडीच शतकांपूर्वी वैद्यकक्षेत्रात वेगळी दिशा दर्शविली व संपूर्ण आरोग्यप्राप्त करून देणारे होमिओपॅथी हे नवीन शास्त्र संशोधले आणि विकसितही केले. आज जगभर त्याची ख्याती पसरत आहे. गेल्या शतकामध्ये डॉ. मेड रिक गिअर्ड हॅमर या जर्मन सुपुत्राने 'जर्मन न्यू मेडिसिन' (जी.एन.एम.) या नावाखाली एक नवीन वैद्यक संशोधन केले आहे व ते विकसित होत आहे. कोणतेही नवीन संशोधन जगापुढे मांडताना त्या संशोधकास केवळ असुयेपोटी अडथळे व अनंत यातना भोगाव्या लागतात. हा कोणत्याही विशेषत: वैद्यक संशोधनातील इतिहास आहे. आजदेखील बहुसंख्य आधुनिक वैद्यक शास्त्रज्ञ आपल्या प्रस्थापित वैद्यक शास्त्रास सोडून इतर शास्त्रे शास्त्र म्हणून मानायलाच तयार नसतात. डॉ. हनिमन यांचे हेमिओपॅथिक संशोधन त्यावेळेच्या जर्मन सरकारने बेकायदेशीर ठरवले गेल्याने त्यांना जर्मनी सोडून पॅरिसला जावे लागले. डॉ. हॅमर यांनाही तशाच प्रकारचा त्रास होऊन आपली जन्मभूमी सोडून इटलीस आश्रय घ्यावा लागला.
डॉ. हॅमर यांचा जन्म १९३५ ला फ्रिसिमा जर्मनी येथे झाला. त्यांनी टुबीजेन विद्यापीठामध्ये औषधशास्त्र आणि वेदान्ताचा अभ्यास केला. वयाच्या २२ व्या वर्षी वेदान्तातील पदवीव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आणि २६ व्या वर्षी एम.डी. पदवी संपादन केली. १९७२ ला ट्युबीजेन विद्यापीठाच्या आरोग्यधाममध्ये तेथील कॅन्सर विभागात इंटरन्सिट म्हणून त्यांची नेमणूक झाली. या कामाव्यतिरिक्त ते व त्यांची पत्नी डॉ. सिग्नीड हॅमर (एम.डी) यांच्या खासगी क्लिनिकमध्ये त्यांना मदत करू लागले. वैद्यकी उपकरणे व संशोधनातही त्यांना विशेष रस होता. शल्य शास्त्रातील ‘हॅमरस् स्कालपेल’ जे रेझर ब्लेडपेक्षा २० टक्के जास्त प्रभावी आहे त्याचे संशोधन, फिजिओथेरपीमध्ये रुग्णांच्या आवश्यकतेनुसार आकार घेणारे टेबल हीदेखील त्यांची जगप्रसिद्ध निर्मिती. या निर्मितीमुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारल्याने त्यांनी इटलीमध्ये स्थलांतर केले. जर्मनीमध्ये त्यांच्या संशोधनास विरोध आणि कोर्ट केसदेखील त्यांच्या स्थलांतराचे मुख्य कारण.
आॅगस्ट १९७८ ला डॉ. हॅमर यांचा मुलगा डर्क यास इटलीचे प्रिन्स विक्टर इम्यान्युएलकडून गोळी लागल्याने त्याचा अपघाती मृत्यू डॉ. हॅमर यांच्या बाहुपाशात झाला. या घटनेनंतर काही महिन्यांत डॉ. हॅमर यांना पुरुषांडाचा
कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. डर्क हॅमर यांच्या मृत्यूचे निमित्त आणि डॉ. हॅमर यांना झालेला कॅन्सर यामुळे डॉ. हॅमर यांच्या नवीन वैद्यक प्रवासास सुरुवात झाली. त्यांनी म्युनिच विद्यापीठातील कॅन्सरपीडित रुग्णाचा कॅन्सरपूर्व इतिहास आणि त्याच्या अहवालाची चाचपणी सुरू केली. त्यातून निष्कर्ष निघाला की, शरीरातील सर्व घटनांवर मेंदूचे नियंत्रण असते. त्यांनी सर्व रुग्णांचे मेंदूचे स्कॅन रिपोर्ट मागविले. त्यांच्या असे लक्षात आले की, आयुष्यातील कोणत्याही मानसिक धक्क्याचे प्रतिबिंब मेंदूच्या स्कॅनवर पडत असते. मेंदूच्या ज्या भागात बदल दिसतो, त्या भागाचे नियंत्रण असलेल्या अवयवांवर त्याचा परिणाम दिसून येतो. ज्या त्या अवयवाच्या अनारोग्यानुसार मेंदूच्या त्या-त्या भागातील स्कॅनवर वर्तुळाकार प्रतिमा दिसून येतात. डॉ. हॅमर यांच्या ब्रेन स्कॅनमध्येही तशा प्रतिमा दिसून आल्या. पुन्हा पुन्हा स्कॅन करूनदेखील त्या प्रतिमा स्थिर होत्या. याचाच अर्थ मशीनचा दोष नव्हता. मेंदूतील स्कॅनच्या ज्या विभागास अशा प्रतिमा दिसून आल्या, त्यास हॅमर फोकस असे नाव दिले गेले. डॉ. हॅमर यांच्या म्हणण्यानुसार, अंतरमनावरील मानसिक आघातामुळे कॅन्सर तसेच अनेक शारीरिक रोग उद्भवतात. मनावर आघात होतो. त्याचे प्रतिबिंब मेंदूच्या आरशावर उमटते. त्यापासून प्रक्षेपित झालेल्या रसायनामुळे ज्या-त्या आघाताच्या कारण व तीव्रतेनुसार शरीरातील त्या-त्या भागातील अवयवामध्ये प्रतिक्रिया उमटते. न्यूटनच्या नियमानुसार क्रिया व प्रतिक्रिया एकमेकांच्या विरुद्ध असतात. याचाच अर्थ रोग होतो तेव्हा तो बरा होण्याची क्रियाही शरीरात सुरू असते. क्रिया व प्रतिक्रियामधील कारण दूर व्हायला हवे. ही निरोगी अवस्था साधते हॅमरचे जर्मन नवीन वैद्यक. जर्मन नवीन वैद्यक पद्धत वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवेल अशी आशा आहे.
(लेखक प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत.)