वेगळा विचार करायला लावणारे ‘जीनियस’
By Admin | Updated: October 18, 2015 23:47 IST2015-10-18T23:23:04+5:302015-10-18T23:47:11+5:30
अच्युत गोडबोले : विद्यार्थी, पालकांशी साधला संवाद

वेगळा विचार करायला लावणारे ‘जीनियस’
कोल्हापूर : पालक आपली स्वप्ने मुलांवर लादत आहेत. त्यातून पगाराचे मोठे पॅकेज, फ्लॅट आणि चारचाकी मिळविली म्हणजे आयुष्याचे सार्थक झाले, असा समज असलेली संस्कृती सध्या रुजत आहे. अशा स्थितीत ‘जग बदलणारे जीनियस’ हे तरुणाईसह पालकांना वेगळा विचार करायला लावतील, असे प्रतिपादन लेखक अच्युत गोडबोले यांनी रविवारी येथे केले.
येथे राजर्षी शाहू स्मारक भवनात ‘जग बदलणारे १२ जीनियस’ या पुस्तकावरील व्याख्यानात ते बोलत होते. ग्रंथ कॉर्नर, जिल्हा मुख्याध्यापक संघ, मनोविकास प्रकाशनतर्फे आयोजित कार्यक्रमास सहलेखिका दीपा देशमुख उपस्थित होत्या.
गोडबोले म्हणाले, विविध स्वरूपांतील जाहिराती पाहून पालक आपली स्वप्ने मुलांवर लादत आहेत. पालक अशी स्वप्ने साकारण्यासाठी अनेकदा मुलांची आवड लक्षात घेत नाहीत. पगाराचे मोठे पॅकेज, फ्लॅट आणि चारचाकी मिळविली म्हणजे आयुष्याचे सार्थक झाले, असा समज असलेली संस्कृती सध्या रुजत आहे. या संस्कृतीच्या पलीकडे जाऊन तरुणाई, पालकांना ‘जग बदलणारे जीनियस’ हे वेगळा विचार करायला आणि नवी स्वप्ने पाहायला लावतील. मुला-मुलींनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करावे. त्यातून निश्चितपणे कामाचे समाधान तर मिळेलच; शिवाय संबंधित क्षेत्राच्या विकासाला गती मिळेल.
देशमुख म्हणाल्या, सध्याच्या तरुणाईला उपदेशात्मक लेखन आवडत नाही. ते लक्षात घेऊन ‘जग बदलणारे १२ जीनियस’चे लेखन केले आहे. तरुणाईला हवे ते देण्याचा प्रयत्न केला आहे. हे ‘जीनियस’ वाचकांना आपले मित्र-नातलग असल्यासारखे वाटतील, असे लेखन केले आहे.शिवाजी विद्यापीठाच्या वाचन कट्ट्याचे समीर अनपट, न्यू कॉलेजचे प्रा. टी. के. सरगर यांचा गोडबोले यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. बी. पवार, सचिव आर. वाय. पाटील, आदी उपस्थित होते. ‘ग्रंथ कॉर्नर’चे संचालक सुभाष पाटील यांनी स्वागत केले. सीमा मकोटे यांनी सूत्रसंचालन केले.
विचारवंत, संशोधक व्हावेत
‘जग बदलणारे १२ जीनियस’ हे प्रथम प्रकाशित होईल. त्यात गॅलिलिओ गॅलिली, आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग, एडवर्ड जेन्नर, रॉबर्ट कॉख, लुई पाश्चर, अॅलेक्झांडर फ्लेमिंग, मेरी क्युरी, लीझ माइट्नर, जे. रॉबर्ट ओपेनहायमर, रिचर्ड फाईनमन यांच्या जीवनपटाचा समावेश आहे. ७२ ‘जीनियस’मध्ये विज्ञानातील २४, तंत्रज्ञानातील १२ व अर्थशास्त्र, मानसशास्त्र, क्रांतिकारक व तत्त्वज्ञ अशा ३६ जण असतील. प्रत्येकाचे काम ५० ते ६० पानांमध्ये मांडला जाईल. त्यातून तरुणाईला निश्चितपणे नवीन काही तरी मिळेल. सहा ते आठ महिन्यांला १२ ‘जीनियस’ची मालिका प्रकाशित होईल.