सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाने सामान्य होरपळले

By Admin | Updated: September 3, 2016 00:55 IST2016-09-03T00:46:55+5:302016-09-03T00:55:30+5:30

कार्यालयांमध्ये शुकशुकाट : सुमारे ४० हजारांचा सहभाग; संप यशस्वी झाल्याचा दावा; आरोग्य यंत्रणा कोलमडल्याने रूग्णांचे हाल

The general staffing of the government employees is normal | सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाने सामान्य होरपळले

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाने सामान्य होरपळले

कोल्हापूर : सरकारी कर्मचारी व कामगारांच्या शुक्रवारच्या लाक्षणिक संपात जिल्ह्यातील सुमारे ४० हजार वर्ग-३ व वर्ग-४ चे सरकारी कर्मचारी व औद्योगिक क्षेत्रातील कामगार सहभागी झाले. यामुळे शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प होऊन नागरिकांची गैरसोय झाली; तर आरोग्य यंत्रणा कोलमडल्याने रुग्णांची हेळसांड झाली. हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा कोल्हापूर जिल्हा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने केला आहे.
देशस्तरावरील कामगार-कर्मचाऱ्यांच्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर महागाई आणि बेरोजगारीला आळा घाला, कंत्राटीकरण, खासगीकरण रद्द करा, आयकर गणनेसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवा, वेतन पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारने राज्यांना आर्थिक मदत द्यावी, यासाठी देशातील ११ केंद्रीय कामगार संघटनांनी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपात जिल्ह्यातील कर्मचारी व कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सकाळी १० वाजता टाऊन हॉल उद्यान येथे सर्व कर्मचारी व कामगार एकवटले. या ठिकाणी झालेल्या सभेत सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस अनिल लवेकर, महसूल कर्मचारी संघटनेचे नेते विलास कुरणे, कामगार नेते दिलीप पवार, अतुल दिघे, उदय नारकर, चंद्रकांत यादव, आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास कर्मचाऱ्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत सहभागी कर्मचाऱ्यांनी महागाईला आळा घाला, आमदार, खासदारांना पेन्शन मग आम्हाला का नाही? भांडवलशाही आणणाऱ्या सरकारचा निषेध आहे, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना शासन झालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दसरा चौक, सुभाष रोड, उमा टॉकीज, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महानगरपालिका या मार्गांवरून येऊन टाऊन हॉल उद्यान येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी संप यशस्वी झाल्याचा दावा करून कर्मचारी व कामगार हिताविरोधी धोरण अवलंबणाऱ्या राज्यकर्त्यांना हा इशारा असल्याचे नेत्यांनी सांगितले.
या संपात जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तहसील व प्रांताधिकारी कार्यालये, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कृषी विभाग, शिक्षण विभाग, आय.टी.आय., शासकीय तंत्रनिकेतन, गव्हर्न्मेंट प्रेस, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व शासकीय बॅँका येथील कर्मचारी सहभागी झाले. महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी काळ्या फिती बांधून, तर काहींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून पाठिंबा दिला. तसेच कागल पंचतारांकित, शिरोली व गोकुळ शिरगाव एमआयडीसी (हॅलो ३ वर)


संपातील मागण्या
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये सुधारणा करून त्यामधून कामगार, कर्मचारी यांच्या विरोधातील शिफारशी अट रद्द करून सातवा वेतन आयोग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्वरित लागू करावा.
नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठीची अंशदायी पेन्शन योजना रद्द करून नोव्हेंबर २००५नंतरच्या कर्मचाऱ्यांनाही जुनीच पेन्शन योजना लागू करावी.


खेमनार यांनी घेतली आढावा बैठक
या संपामुळे जिल्हा परिषदेतील कामकाजही ठप्प झाले. अन्य कामकाज ठप्प असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली.
जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक, नर्सिंग, शिपाई, लिपिकवर्गीय, औषधनिर्माता, अंगणवाडी सुपरवायझर या संघटना पूर्णपणे संपात उतरल्या होत्या; तर जिल्हा परिषद कर्मचारी युनियन मात्र संपात सहभागी नव्हती. तरीही जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची अत्यल्प उपस्थिती होती. अधिकाऱ्यांच्या चालकांनी मात्र काळ्या फिती लावून काम केले. संपामुळे जिल्ह्यातूनही फारसे कुणी जिल्हा परिषदेकडे फिरकले नाही.


‘व्हाईट आर्मी’ची आरोग्य सेवा
संपामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडू नये यासाठी ‘व्हाईट आर्मी’चे संस्थापक अशोक रोकडे यांच्या नेतृत्वाखालील २० जवानांच्या पथकाने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून चोवीस तास आरोग्यसेवा केली.
रुग्णालयात एक्स-रे काढायला मदत करणे, रुग्ण शिफ्ट करणे, बाहेरून आलेल्या रुग्णांना अपघात विभागात नेणे यासह डॉक्टरांना मदत करणे अशा स्वरूपाची ही सेवा केली.

Web Title: The general staffing of the government employees is normal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.