गवे पुन्हा परतले, गस्तीवरील पथकाला रमणमळ्यात घडलं दर्शन
By संदीप आडनाईक | Updated: November 11, 2022 22:49 IST2022-11-11T22:48:53+5:302022-11-11T22:49:51+5:30
गस्ती पथकाने दिवसभरात मिरचीचा धूर करून गव्याना शहरात येण्यासाठी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला.

गवे पुन्हा परतले, गस्तीवरील पथकाला रमणमळ्यात घडलं दर्शन
कोल्हापूर : गेले आठवडाभर वडणगे परिसरात उसाच्या शेतात वावरणाऱ्या सहा गव्यांचा कळप शुक्रवारी पुन्हा रमणमळा परिसरात गस्त घालणाऱ्या फिरत्या पथकाला आढळला. दिवसभर वन विभागाच्या पथकाला गवे परतीच्या मार्गावर असल्याचे पाऊलखुणा मिळाल्या आहेत. त्यामुळे फिरते पथक तसेच रात्रपाळीच्या गस्ती पथकाला गवे परतीच्या वाटेवर असल्याचे लक्षात आले.
गस्ती पथकाने दिवसभरात मिरचीचा धूर करून गव्याना शहरात येण्यासाठी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी ६ वाजून दहा मिनिटांनी गव्यांचा हा कळप पुन्हा रमणमळा परिसरात आल्याच्या पाऊलखुणा मिळाल्या. पंचगंगा नदीच्या पात्रातून हे गवे पुन्हा शहराच्या दिशेने परतले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा मुक्काम याच भागात होता. दरम्यान, करवीरचे वनाधिकारी रमेश कांबळे आणि वनपाल विजय पाटील यांनी शहरातील वाहनाची गर्दी आणि माणसांची वर्दळ पाहून बुजले असल्याची शक्यता वर्तवली आहे. गवे निश्चितपणे पहाटे पर्यंत परत जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.