गौरवाड पेयजल योजना रखडली
By Admin | Updated: December 5, 2014 00:21 IST2014-12-05T00:09:57+5:302014-12-05T00:21:33+5:30
नेत्यांच्या पुढाकाराची गरज : जागेअभावी दोन वर्षांपासून निधी अखर्चीत

गौरवाड पेयजल योजना रखडली
अजित चंपूण्णावर - बुबनाळ -गौरवाड (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतून एक कोटी ३० हजार ५०० रुपये इतका निधी मंजूर होऊनही नळ पाणीपुरवठा जलशुद्धिकरण केंद्राचे काम रखडले आहे. स्थानिक नेत्यांमधील श्रेयवादामुळे व जागेअभावी गेल्या दोन वर्षांपासून निधी पडूनच आहे.
दरम्यान, येथील तानाजी हुलवान या वृद्धाचा दूषित पाण्यामुळे नाहक बळी गेला आहे. जलशुद्धिकरण केंद्राअभावी पिण्यास थेट नदीतून पाणीपुरवठा होत असल्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावहितासाठी श्रेयवाद बाजूला ठेवून सामुदायिकरीत्या प्रयत्नांद्वारे ही योजना तत्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
गौरवाड येथे १९९० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यानंतर जुलै १९९३ मध्ये ग्रामपंचायतीने ही योजना ताब्यात घेऊन कार्यान्वित केली. मात्र, केवळ आठच दिवसांत नदीतील जॅकवेलमध्ये खाऱ्या पाण्याचा झरा लागल्याने बंद करण्यात आला. त्यानंतर गावास खासगी पाणीपुरवठ्याद्वारे पिण्यास पाणीपुरवठा केला जात होता.
२००१-०२ साली महाजल योजनेतून पूर्वीच्या पिण्याच्या टाकीसाठी नवीन पाईपलाईन कार्यान्वित केली.
टीसीएल पावडर वापरून गावास पाणीपुरवठा केला जात होता. जलशुद्धिकरण केंद्र नसल्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्न वेळोवेळी ऐरणीवर आल्याने ग्रामपंचायतीने २०१०-११ साली राष्ट्रीय पेयजल योजनेतून जलशुद्धिकरण केंद्रासाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठविला, त्यास नोव्हेंबर २०१२ रोजी शासनाने मंजुरी दिली. दरम्यान, गावाला गायरान नसल्यामुळे जागेची अडचण निर्माण झाली. यापूर्वी ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची टाकी ग्रामपंचायत वहिवाटीच्या
गट नं. २९५ या गटांत दोन गुंठे जागेत बांधली आहे. तशी नोंदही सात-बारा पत्रकी आहे. त्यालगत असणाऱ्या गट नं.२६० या गटातील फिल्टर हाऊससाठी पाच गुंठ्यांची जागा आरक्षित करावी, यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविला होता. त्याअनुषंगााने तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी एप्रिल २०१३ रोजी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना या आरक्षित जागेबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे लेखी आदेशही दिले आहेत.
या लेखी आदेशानंतर आरक्षित जागेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतीमार्फत कितपत प्रयत्न केले, हा संशोधनाचा विषय आहे. गावहितासाठी श्रेयवाद बाजूला ठेऊन ग्रामपंचायतीच्यावतीने केलेली ती आरक्षित जागा उपलब्ध करून घेण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे असून, ही योजना तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
योजनेला श्रेयवादाचा अडसर
याबाबत सरपंच सन्मती केस्ते यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, गौरवाडमध्ये जवळजवळ सात एकर जागा गावठाण हद्दवाढ विस्तारासाठी आरक्षित आहे. बहुतांश गावालगतच्या जमिनी या श्री नृसिंह सरस्वती देवस्थानच्या नावे नोंद आहेत. त्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार होत नाहीत. त्यातच आरक्षित जागा असूनही हद्दवाढ नसल्याने गावकऱ्यांना जागेच्या कमतरतेमुळे त्यांनी आरक्षित जमिनी करार करून घेतल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळची बापू सूर्यवंशी यांच्या
गट नं. २६० मधील पाच गुंठे जागा फिल्टर हाऊससाठी मागितली आहे. ही जागा गावठाण विस्तारवाढीत येते. त्यामुळे त्याला शासनस्तरावर अडचण नाही; मात्र स्थानिक राजकारण्यांच्या श्रेयवादातून ही योजना रखडली आहे.
यड्रावकरांनी पुढाकार घ्यावा
गौरवाड ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी व विरोधी आघाडी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मानतात. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेतल्यास जागेचा प्रश्न मिटू शकतो. जागेअभावी गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले फिल्टर हाऊसचे बांधकामही सुरू होऊन योजना कार्यान्वित होऊ शकते. यामुळे गावहितासाठी यड्रावकरांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.