कचरा डेपो कोकणनगरमध्ये...

By Admin | Updated: November 18, 2015 00:05 IST2015-11-17T23:10:27+5:302015-11-18T00:05:48+5:30

रत्नागिरी नगरपरिषद : साळवी स्टॉप कचरामुक्त, आजपासून कार्यवाही

Garbage depot in Konkanagar ... | कचरा डेपो कोकणनगरमध्ये...

कचरा डेपो कोकणनगरमध्ये...

रत्नागिरी : शहराच्या प्रवेशद्वारावरील धुराचे साम्राज्य आणि जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातील कचरा डेपो आता इतिहासजमा होणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात गेल्या वीस वर्षांपासून टाकला जाणारा संपूर्ण शहरातील कचरा उद्या (बुधवार) पासून शहरातील कोकणनगर येथील चिरेखाणींच्या मोकळ्या जागेत टाकला जाणार आहे.
गेल्या वीस वर्षांपासून साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात शहरात दररोज जमा होणारा २२ ते २४ टन कचरा टाकला जात होता. दर महिन्याला याठिकाणी ६५० ते ७०० टन कचरा टाकला जात होता. गेल्या काही वर्षात याठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले. त्यामुळे जलशुध्दिकरण केंद्र कचऱ्यात हरवल्यासारखी स्थिती निर्माण झाली. जेथे शहरवासीयांना पिण्यासाठी पुरवठा करावयाच्या पाण्याचे शुध्दिकरण केले जाते, त्याच आवारात कचऱ्याच्या ढिगांमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे मोकाट श्वान, मोकाट जनावरे, उंदीर व घुशी यांचे साम्राज्य या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात निर्माण झाले. पक्ष्यांमुळेही येथील दुर्गंधीयुुक्त कचरा इतस्तत: पसरत होता.
कचऱ्याची भयावह स्थिती जलशुध्दिकरण प्रक्रियेबाबत संशय निर्माण करणारी होती. गेल्या वर्षभराच्या काळात सातत्याने याठिकाणी कचऱ्याचे ढीग पेटवून दिले जात होते. त्यामुळे संपूर्ण साळवी स्टॉप परिसराला धुराच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते.
आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. कचरा पेटवल्यामुळे मुख्य रस्त्यावर धुराचे लोळ येत होते. त्यामुळे वाहने चालविणे धोकादायक बनले होते. या सर्व समस्यांबाबत स्थानिकांनी अखेर सेनेचे तालुकाप्रमुख व नगरसेवक बंड्या साळवी यांच्याकडे न्याय मागितला. त्यानुसार येत्या १५ दिवसात जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकणे बंद न केल्यास कचऱ्याच्या गाड्याच केंद्रात जाऊ देणार नाही, असा इशारा साळवी यांनी दिला होता.
जिल्हाधिकाऱ्यांकडेही त्यांनी याबाबत गाऱ्हाणे मांडले होते. त्याची तातडीने दखल घेत आज नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांनी नगरसेवक प्रदीप साळवी यांच्या उपस्थितीत कोकणनगरमधील प्रदीप सावंत यांच्या जागेतील मोकळ्या चिरेखाणींची पाहणी करण्यात आली. त्यानंतर याठिकाणची जागा निश्चित करण्यात आली असून, उद्या बुधवारपासून कोकणनगरच्या या चिरेखाणींमध्ये रत्नागिरीचा कचरा टाकला जाणार आहे.
कोकणनगरच्या या जागेत पूर्वी चिरेखाणी होत्या. प्रदीप सावंत यांचीच ही जागा असल्याने त्यांनी कचरा टाकण्यास मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)


घनकचरा प्रकल्प : अथक प्रयत्न करूनही पदरी अपयश...
रत्नागिरी नगरपरिषदेची कचरा समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांनी गेल्या काही काळात सातत्याने प्रयत्न केले. दांडेआडोम येथील जागेत घनकचरा प्रकल्पासाठी नगरपरिषदेच्या मालकीची जागा असून, रस्त्याचा प्रश्नही सुटला होता. मात्र, याठिकाणी प्रकल्प उभारण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच शहरापासून १२ किलोमीटर्सवर असलेल्या या ठिकाणी प्रकल्प खर्चिक ठरला असता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी घनकचरा प्रकल्प होण्यासाठी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.


‘लोकमत’चा पाठपुरावा
‘लोकमत’ने वारंवार या कचऱ्याचा प्रश्न लावून धरला होता. या प्रश्नावर सडेतोड लिखाण केल्याने हा प्रश्न आता कायमचा निकाली निघणार आहे.

Web Title: Garbage depot in Konkanagar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.