उद्धव गोडसेकोल्हापूर : शहर आणि परिसरात खुलेआम कोयते, एडका, तलवारी नाचवून दहशत माजवणाऱ्या झुंडी गल्लोगल्ली तयार झाल्या आहेत. व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याची स्पर्धा त्यांच्यात सुरू आहे. विरोध करणाऱ्या स्थानिकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यापुढे जाऊन पोलिसांवरही दगडफेक करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन टोळ्यांना एवढी हिम्मत येते कुठून, याचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ पोलिसांसह समाजावरही आली आहे.गेल्या आठवड्यात फुलेवाडीत एका बेकरीत घुसून चौघांनी तोडफोड केली. कोयता, एडक्याची दहशत दाखवून बेकरी चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. उजळाईवाडी येथील एका बेकरीत अशाच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. विशेष म्हणजे त्या टोळीत दोन अल्पवयीनांचा समावेश होता.बेकरीची तोडफोड केल्यानंतर या टोळीने परिसरातील कॉलनीत दहशत माजवली. स्थानिकांच्या वाहनांची तोडफोड करून घरांवर दगडफेक केली. कुठेही तक्रार करा. आमचे कोणी वाकडे करीत नाही, असे म्हणत त्यांनी पुन्हा तोडफोड करण्याची धमकी दिली. दोन दिवसांपूर्वी शाहूनगर चौकात पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. हल्लेखोरांमध्ये चौघे अल्पवयीन होते.या प्रातिनिधिक घटना जिल्ह्यातील गुन्हेगारीत अल्पवयीनांचा सहभाग आणि त्यांची वाढती दहशत स्पष्ट करणाऱ्या आहेत. यांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास येणाऱ्या काळात त्यांच्या टोळ्या पोलिसांना डोईजड ठरण्याचा धोका आहे तसेच सामाजिक स्वास्थ्य हरवण्याची शक्यता आहे.
नशेखोरीने गुन्हेगारीत वाढगांजा, ड्रग्ज आणि दारूच्या आहारी गेलेली तरुणाई दिवसाढवळ्या शस्त्रे नाचवत आहे. अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट मुळापासून उद्ध्वस्त होत नसल्याने गुन्हेगारीचा धोका आणखी वाढत आहे. मुलांकडे दुर्लक्ष करणारे पालकही याला कारणीभूत ठरत आहेत..भुरटे आयडॉलसराईत गुन्हेगार, अवैध व्यावसायिक सोशल मीडियातून स्वत:चे प्रमोशन करतात. या आभासी जगाला भुलणारी १४ ते १८ वयोगटातील मुलं गुन्हेगारांना स्वत:चे आयडॉल ठरवत आहेत. यातून अल्पवयीन गुन्हेगारांच्या टोळ्या वाढत असून, त्यांना वेळीच यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न पोलिस आणि पालकांना करावे लागणार आहेत.
कुठे आहे पोलिसी खाक्या?उजळाईवाडी येथे बेकरीची तोडफोड करून पळालेल्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्लेखोरांनी दगडफेक केली. काही गुन्हेगार सोशल मीडियातून पोलिसांना खुले आव्हान देत आहेत, त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.राजकीय नेत्यांचे मौनगुन्हेगारी टोळ्यांकडून वाढलेल्या दहशतीनंतर लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांनी गुन्हेगारांच्या विरोधात भूमिका घेणे नागरिकांना अपेक्षित आहे. मात्र, एकाही नेत्याचा गुन्हेगारांच्या विरोधात आवाज निघत नाही. उलट त्यांच्या वाढदिवसाला गुन्हेगारांचे फोटो फलकांवर झळकतात. यातून गुन्हेगारांना बळ मिळत आहे.