बोगस वाहन परवाना; पुणे व्हाया कोल्हापूर कनेक्शन, ‘एआय’द्वारेही परस्पर परवाने दिल्याची धास्ती
By सचिन यादव | Updated: November 8, 2025 18:57 IST2025-11-08T18:57:04+5:302025-11-08T18:57:24+5:30
आरटीओ सक्रिय

बोगस वाहन परवाना; पुणे व्हाया कोल्हापूर कनेक्शन, ‘एआय’द्वारेही परस्पर परवाने दिल्याची धास्ती
सचिन यादव
कोल्हापूर : कोणत्याही चाचणीशिवाय कच्चे आणि पक्के वाहन चालविण्याचा परवाना देणारी टोळी पुणे आणि कोल्हापूर विभागात सक्रिय झाली आहे. पुणे (उरळीकांचन) येथेही या प्रकारच्या जाहिरात करून नागरिकांची फसवणूक केली आहे. जिल्ह्यात काही सोशल मीडियावरील जाहिराती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रडारवर आहेत. बोगस परवान्याचे पुणे, कोल्हापूर कनेक्शन आहे.
जयसिंगपूर शिरोळ मार्गावरील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीर शिबिर भरवून वाहन परवाना काढून दिल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून राज्यभरातील आणखी काही टोळीतील नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींनी ६००हून अधिक जणांना गंडे घातल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस येत आहे.
वाचा: बेकायदेशीर लायसन्स प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी
परवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे, चाचणी टाळून तत्काळ परवाना मिळविण्यासाठी काहींना १९९९ रुपयांत वाहन चालविण्याचा परवान्याची सोशल मीडियावरील जाहिरात पाहिली. त्याच्यावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून काहींनी ऑनलाइन पैसे भरले. तर काहींना जयसिंगपूर शिरोळ मार्गावरील हॉटेलमध्ये शिबिराच्या ठिकाणी बोलविण्यात आले.
त्यांना आरटीओ कार्यालयात ज्याप्रमाणे रजिस्टरद्वारे नोंदणी केली जाते, त्याप्रमाणे कागदपत्रांची तपासणी करून साधी पावती दिली आहे. तत्काळ परवाना मिळेल, अशा भूलथापांना नागरिक बळी पडले आणि त्यांनी शिबिराच्या संयोजकाला दोन हजार रुपये दिले. प्रामाणिकपणा म्हणून संयोजकांनी त्यांना एक रुपयाही परत देऊन अधिक विश्वास संपादन केला.
प्रादेशिक परिवहन विभागाचे दर
- शिकाऊ परवाना २०० रुपये
- कायम परवाना ७९८ रुपये
बोगस शिबिरातील दरपत्रक
- शिकाऊ परवाना ८०० रुपये
- कायम परवाना १२०० रुपये
एआयद्वारेही फसवणुकीची भीती
राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर एआयद्वारे फसवणूक करून कसा परवाना दिला जातो. त्यासाठी हॅकर्स कोणत्या प्रकारची गुन्ह्याची पद्धत वापरतात, याचे सादरीकरण केले. मुंबई आणि पुणे या ठिकाणी अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडत असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.
कोल्हापूर आरटीओ झाले दक्ष
शिकाऊ परवान्यातील परीक्षेत कोणीही परस्पर बदल करु नये. हॅकर्स सिस्टीमवर ताबा मिळवू नये, यासाठी कॅप्चा कोड अधिक सक्षम केला आहे. अन्य कोणत्याही सर्व्हर ऐवजी परिवहन विभागाच्या यंत्रणेतून शिकाऊ परवाना परीक्षा घेतली जात आहे. त्याबाबतच्या सूचना लर्निंग विभागातील मोटार वाहन निरीक्षकांना दिल्या आहेत.
एआयद्वारे आणि बेकायदेशीर शिबिर भरवून लायसन्स देणाऱ्या टोळीवर प्रादेशिक कार्यालयाची करडी नजर आहे. नागरिकांनीही त्याबाबत सतर्क रहावे. कोणाचीही फसवणूक होऊ नये, म्हणून त्याबाबतचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. -संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी
पुणे आणि काही परिसरात अशा प्रकाराच्या टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. त्याची माहिती संबंधित आरटीओंना दिली जाणार आहे. नागरिकांच्या निदर्शनास असे प्रकार आल्यास तातडीने माहिती कळवावी. -विजय इंगवले, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, इचलकरंजी