गणेशोत्सव साधेपणाने, सगळा पैसा पूरग्रस्तांसाठी; गणेश मंडळांची सामाजिक बांधिलकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 21:09 IST2019-08-16T21:08:01+5:302019-08-16T21:09:21+5:30
मंगळवार पेठ परिसरातील सुमारे १२५ गणेश मंडळे, तालीम संस्थांनी गणेशोत्सव साध्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.

गणेशोत्सव साधेपणाने, सगळा पैसा पूरग्रस्तांसाठी; गणेश मंडळांची सामाजिक बांधिलकी
कोल्हापूर : कोल्हापूरवर ओढवलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मंगळवार पेठ परिसरातील सुमारे १२५ गणेश मंडळे, तालीम संस्थांनी गणेशोत्सव साध्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. उत्सवाचा डामडौल, सजावट, देखावे रद्द करून जमा झालेला सगळा निधी पूरग्रस्तांना घरे बांधण्यासाठी देण्यात येणार आहे. शुक्रवारी दैवज्ञ बोर्डिंगमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गणेशोत्सव २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे; त्यासाठी कोल्हापूरकरांची जय्यत तयारी सुरू असताना महापुराने थैमान घातले. गावं, घरं, जनावरे, आयुष्यभराची जमापुंजी, संसार सगळं नद्यांनी आपल्या कवेत घेतले. ओसरत असलेल्या पुराने नागरिकांच्या डोळ्यांत मात्र अश्रूंचा महापूर आणला आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी मंगळवार पेठ परिसरातील सुमारे सव्वाशे तरुण मंडळे शुक्रवारी दैवज्ञ बोर्डिंग येथे एकत्र आली.
मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस यांचेत झालेल्या बैठकीत एकमताने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करून जमा झालेल्या वर्गणीचा पैसा पूरग्रस्तांना घरे बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.