Ganesh Visarjan 2018 : कोल्हापुरात पोलिसांचा खडा पहारा, सामाजिक संस्था तत्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 20:18 IST2018-09-23T20:16:08+5:302018-09-23T20:18:05+5:30
कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहिला. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय सेवा पुरविणे, पाणी वाटप आदी स्वरूपातील सेवा विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांकडून तत्परपणे सुरू होते.

Ganesh Visarjan 2018 : कोल्हापुरात पोलिसांचा खडा पहारा, सामाजिक संस्था तत्पर
कोल्हापूर : कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहिला. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय सेवा पुरविणे, पाणी वाटप आदी स्वरूपातील सेवा विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांकडून तत्परपणे सुरू होते.
मिरवणूक मार्गासह पंचगंगा नदी घाट, इराणी खण आदी विसर्जन ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. ‘व्हाईट आर्मी’ चे स्वयंसेवक मिरवणूक मार्गावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत होते. वैद्यकीय पथकांमध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, डॉक्टरांची निहा संघटना, कोल्हापूर जिल्हा मुस्लिम मेडिको आणि पॅरामेडिको असोसिएशन या संघटनांचे पदाधिकारी, सभासद डॉक्टरांचा सहभागी होते.
आपत्कालीन वैद्यकीय पथकाजवळ सावली केअर सेंटर, अॅस्टर आधार हॉस्पिटल यांच्या रुग्णवाहिका उपलब्ध होत्या. विसर्जन मिरवणुकीवेळी सलग चोवीस तास जिवाची पर्वा न करता अहोरात्र दक्ष राहून चोख सेवा बजावणाऱ्या महापालिका अग्निशमन दलातील जवानांना भोजन जाग्यावर पुरविण्याचे सेवाभावी कार्य कळंबा येथील बापूरामनगरातील कांदळकर कुटुंबीयांनी केले.
शहराची टेहळणी
मिरवणुकीदरम्यान संपूर्ण शहरावर टेहळणी करण्यात येत होती. पोलीस मनोऱ्यावरून दुर्बिणीद्वारे टेहळणी केली जात होती. शहरात विविध ठिकाणी बसविलेल्या १६५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मिळणाऱ्या चलत्चित्रांवरही पोलिसांची बारीक नजर होती.