गणेश जयंती विशेष: कोल्हापुरात दीड फुटाची आकर्षक पंचगव्य गणेशमूर्ती
By संदीप आडनाईक | Updated: February 1, 2025 19:32 IST2025-02-01T19:31:18+5:302025-02-01T19:32:27+5:30
तीन दिवसात तयार झालेल्या या गणेशमूर्तीत देशी गाईचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र या पंचगव्याचा वापर

गणेश जयंती विशेष: कोल्हापुरात दीड फुटाची आकर्षक पंचगव्य गणेशमूर्ती
कोल्हापूर : 'गोमय वसते लक्ष्मी' या भूमिकेतून कोल्हापूरचे प्रशांत मंडलिक यांनी पर्यावरणाला अनुकूल अशी दीड फुटाची आकर्षक पंचगव्य गणेशमूर्ती उपलब्ध केली आहे. यामध्ये देशी गाईचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र या पंचगव्याचा वापर केलेला आहे. गाईचे शेण हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. गोमूत्रात धन्वंतरीचा निवास, दूध, दही आणि तूप हे मानवी शरीरात पोहचताच रेडियोधर्मी विकिरणांचा दुष्प्रभाव नष्ट करते.
गणेशमूर्तीसाठी शाडूचा वापर करण्याच्या सुधारित मार्गदर्शक सूचना १२ मे २०२० रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्या आहेत. त्यानुसार सर्वत्र शाडूचा वापर केला जातो. मात्र, दिवसेंदिवस शाडूची उपलब्धता कमी कमी होत चालली आहे. त्यामुळे याला गोमय गणेशाचा पर्याय पुढे आला. यामध्ये संपूर्णपणे शेणाचा वापर केला जातो. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका कारागिराने पंचगव्याचा वापर करुन दीड फुटाची आकर्षक गणेशमूर्ती तयार केली आहे. तीन दिवसात तयार झालेल्या या गणेशमूर्तीत देशी गाईचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र या पंचगव्याचा वापर केलेला आहे. याशिवाय यात खाण्याचा डिंक तसेच रंगसजावटीसाठी नैसर्गिक रंगांचा वापरही केलेला आहे.
मूर्ती विसर्जनानंतर यापासून सात्विक खतही निर्माण होणार आहे. ते परिसरातील झाडांना, कुंड्यांना घालून पर्यावरणाचे रक्षण करता येणार आहे. गणेशमूर्तीच्या या पर्यावरणपूरक पर्यायामुळे मातीचा, शाडूचा तसेच पीओपीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. शिवाय या गणेशमूर्तीच्या निर्मितीचा खर्चही कमी येणार असल्यामुळे घरोघरी या मूर्तींची मागणीही वाढणार आहे. कुंभार समाजाने यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी लवकरच एक बैठक हा विभाग घेणार आहे. याशिवाय अशा प्रकारच्या गणेशमूर्ती उत्पादक मूर्तिकारांना योग्य ते अनुदान देऊन मूर्तींचे अधिक उत्पादनही होईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या दिल्लीस्थित राष्ट्रीय कामधेनू आयोगाने ही पंचगव्यापासून तयार केलेली मूर्ती तपासणीसाठी मागवून घेतली आहे. लवकरच त्यासंदर्भातील शिफारशीनंतर विविध रूपातील आकर्षक २१ प्रकारच्या गणेशमूर्ती तयार करण्यात येणार आहेत. अशाप्रकारच्या मूर्तीच्या उत्पादनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. -प्रशांत मंडलिक, कोल्हापूर.