गणेशमूर्तींच्या किमतीत २५ टक्के वाढ होणार
By Admin | Updated: July 4, 2016 00:43 IST2016-07-04T00:43:46+5:302016-07-04T00:43:46+5:30
कुंभारवाड्यांत रात्रीचा दिवस : प्लास्टर, शाडू माती, रंग, मजुरीच्या दरांत २० टक्के वाढ

गणेशमूर्तींच्या किमतीत २५ टक्के वाढ होणार
कोल्हापूर : श्री गणरायाचे आगमन अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे; त्यामुळे कोल्हापुरातील शाहूपुरी, गंगावेश, पापाची तिकटी आणि बापट कॅम्प येथील कुंभारवाड्यांमध्ये मूर्ती तयार करण्याकामी रात्रीचा दिवस होऊ लागला आहे. यात कच्च्या मालाचे दर वाढल्याने यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ होणार आहे.
गणेशोत्सव यंदा ५ सप्टेंबरला सुरू होत आहे; त्यामुळे घरगुती गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला आहे. शाहूपुरी, गंगावेश, पापाची तिकटी, बापट कॅम्प, आदी ठिकाणी गणेशमूर्ती बनविण्याच्या शेडमध्ये कारागीर रात्रंदिवस काम करू लागले आहेत. फेबु्रवारी संपल्यानंतर मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. यंदा प्लास्टर आॅफ पॅरिस, शाडूची माती, विविध कंपन्यांचे रंग, कारागिरांची मजुरी यांत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत वाढ होणार असल्याचे संकेत मूर्तिकारांकडून दिले जात आहेत. रंगाचा डबा जिथे ८०० रुपयांनी मिळत होता, त्याची किंमत आता ९०० ते ९२५ रुपये इतकी झाली आहे. सर्वच घटकांच्या किमती वाढल्याने परिणामी मूर्तींच्या किमतीतही वाढ होणार आहे. गणेशोत्सवापर्यंत आॅर्डर घेतलेल्या सर्व मूर्ती तयार करण्यासाठी कारागिरांच्या कुटुंबांतील सर्व लहान-थोर सदस्य कामात मग्न झाले आहेत. सर्वसाधारणपणे कोल्हापुरात सहा इंच ते पाच फुटांपर्यंतच्या ६० ते ७५ हजार मूर्ती बनविल्या जातात. यातील काही कारागिरांच्या गोदामात हजारो मूर्ती अगदी रंगकामासह तयार आहेत. त्या कर्नाटक, गोवा, कोकण, आदी ठिकाणी पाठविण्यात येणार आहेत. बाहेरगावी पाठविण्यात येणाऱ्या मूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात देण्यात येत आहे.
इको-फे्रंडली गणेशालाच अधिक पसंती
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाण्यामध्ये तत्काळ विरघळणाऱ्या शाडू मातीच्याच गणेशमूर्तींना यंदाही अधिक मागणी आहे. त्यामुळे शाडूमातीच्याच मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार केल्या जात आहेत.
यंदा रंगांसह कच्चा माल समजले जाणारे प्लास्टर आॅफ पॅरिस, शाडू माती, रंगांच्या किमती, कारागिरांची मजुरी यांत २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
- मोहन आरेकर, मूर्तिकार