Ganesh Chaturthi 2018 : ऐतिहासिक न्यू पॅलेसवर श्रीगणराया विराजमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 15:27 IST2018-09-13T15:25:08+5:302018-09-13T15:27:49+5:30
गणेश चतुर्थीनिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक न्यू पॅलेस आणि जुना राजवाडा येथे श्रीगणराया विराजमान झाला. शाही घराण्याच्या या गणेशाचे पालखीतून वाजतगाजत आगमन झाले. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

कोल्हापूरातील ऐतिहासिक न्यू पॅलेस येथे गुरुवारी श्रीगणेशाचे पालखीतून आगमन झाले. शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली
कोल्हापूर : गणेश चतुर्थीनिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक न्यू पॅलेस आणि जुना राजवाडा येथे श्रीगणराया विराजमान झाला. शाही घराण्याच्या या गणेशाचे पालखीतून वाजतगाजत आगमन झाले. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
ऐतिहासिक पापाची तिकटी येथील कुंभारवाड्यातून न्यू राजवाड्यापर्यंत वाजत गाजत पालखीतून श्री गणेशाचे मिरवणुकीने आगमन झाले. घोडा, पालखी, वाजंत्रीसह पारंपारिक वाद्यांच्या गजरात राजवाड्याच्या प्रवेशद्वारात आणलेल्या गणेशाची प्रथम आरती करण्यात आली.
प्रारंभी शाहू महाराज छत्रपती, याज्ञीसेनीराजे, खासदार संभाजीराजे, संयोगिताराजे, मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशस्विनीराजे, यशराजे या शाही घराण्यातील सदस्यांनी गणेशाची आरती ओवाळून पूजा केली.
राजउपाध्याय बाळकृष्ण दादर्णे यांनी अमर जुगर आणि सारंग दादर्णे या राजपुरोहितांच्या उपस्थितीत श्रीगणेशाची षोडपोचारे पूजा केल्यानंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. जुना राजवाडा येथील मंदिरातही बुधवारीच आणलेल्या श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.