बचतीसाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
By Admin | Updated: July 3, 2015 00:49 IST2015-07-03T00:49:23+5:302015-07-03T00:49:23+5:30
‘एसटीपी’ प्लँट : जून ते आॅक्टोबरपर्यंत सांडपाणी थेट पंचगंगेत; मनपाचे आंधळेपणाचे धोरण

बचतीसाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
संतोष पाटील-कोल्हापूर -कसबा बावड्यातील घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) कुचकामी ठरल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. यावर्षी उन्हाळ्यात किमान तीसहून अधिक दिवस दररोज मैलामिश्रित पाणी थेट पंचगंगेत मिसळले. यंदाच्या पावसाळ्याची चाहूल लागताच बंधाऱ्याला धोका नको, या कारणास्तव बरगे काढून काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त पाणी नदीत सोडले. महापालिकेचे धोरण, आंधळेपणामुळे उघडिपीनंतरही मैलामिश्रित पाणी नदीत जातच आहे. दरम्यान, एसटीपी प्रकल्प बंद असल्यामुळे प्रतिदिन १,०७,२३६ रुपये प्रक्रिया खर्चाचे पैसे वाचत असल्याने नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले, तरी मनपाच्या तिजोरीत मात्र लाख रुपयांचा पाऊस पडतो.
महापालिकेच्या हद्दीतील किमान ९५ एमएलडी दूषित सांडपाणी तयार होते. एक एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १४११ रुपये खर्च येतो. प्रक्रिया केंद्राची सध्याची क्षमता ७६ एमएलडी आहे. त्यानुसार प्रतिदिन १,०७,२३६ रुपये प्रक्रिया खर्च अपेक्षित आहे. पावसात नदीत जाणाऱ्या सांडपाण्याची तीव्रता कमी असते तसेच पावसाळ्यातही जयंती नाल्यातील पाणी उपसा करून प्रक्रिया केली जाते, असा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. परिणामी पावसाळ्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यास इतर दिवसांतील पाण्यापेक्षा आपोआपच कमी खर्च येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या हे वाचणारे पैसे मनपाला मिळत असले तरी एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास ठेकेदार मालामाल होणार आहे. ७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्श्याची ३० टक्के रक्कम ठेकेदाराने घातली आहे. ते पैसे भागविण्यासाठी नागरिकांवर गेली दीड वर्षे एसटीपी बंद काळातही सांडपाणी अधिभारातून पैसे उकळले जात आहेत. पुढील १३ वर्षांसाठी नागरिकांच्या खिशाला ही चाट बसणार आहे.
इच्छाशक्तीचा अभाव
बंधाऱ्याला बरगे घालण्यासाठी किमान आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर तत्काळ बरगे घालणे किंवा पाऊस सुरू झाल्यानंतर लगेच बसविणे शक्य नसल्याचे जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले. मात्र, एक-दोन कर्मचाऱ्यांकडून बरगे घालणे व काढण्यापेक्षा ५० पेक्षा अधिक कर्मचारी लावून एका दिवसात पाणी अडविणे शक्य आहे किंवा बंधाऱ्याची उंची वाढवून त्याची क्षमता वाढविण्याची प्रयत्न होताना दिसत नाहीत. याकामी आंधळे धोरण आडवे येत असल्याचे चित्र आहे.
प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा बी.ओ.डी. (बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड) म्हणजे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा कमी करणारे घटक १० एम.जी. प्रती लिटरपेक्षा कमी असतात, तर सध्या नदीत मिसळणाऱ्या काळ्या सांडपाण्याचा बीओडी २०० एम.जी. प्रती लिटरपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यावरून सांडपाणी शुद्धिकरणाचे महत्त्व लक्षात येते.
पावसाळ्यात नदी प्रवाहित असते. दृश्य स्वरूपात प्रदूषणाची तीव्रता जाणवत नसल्याने तक्रारींचे प्रमाण कमी असते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत सुस्त व निवांतच असल्याचे चित्र आहे.