गहिनीनाथ गैबी पीर उरूस उत्साहात

By Admin | Updated: November 18, 2015 00:34 IST2015-11-18T00:31:17+5:302015-11-18T00:34:08+5:30

हजारो भाविकांची उपस्थिती : कागलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, कव्वालीची जुगलबंदी

Gahinath Gabi Peer urus enthusiasm | गहिनीनाथ गैबी पीर उरूस उत्साहात

गहिनीनाथ गैबी पीर उरूस उत्साहात

कागल : येथील ग्रामदैवत हजरत श्री गहिनीनाथ गैबी पीर उरूस हजारो भाविकांच्या उपस्थितीत शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडला. मात्र, यावर्षी भर उरुसाचा दिवस सोमवार असल्यामुळे जेवणावळींचे आयोजन वेगवेगळ्या दिवशी झाले. तर या वर्षी समितीने शर्यती, बकऱ्यांच्या टकरी हे कार्यक्रम रद्द केल्याने उरुसाच्या गर्दीवर त्याचा परिणाम जाणवला.
उरुसाचा कालावधी पाच दिवसांचा असला तरी कागलकर उरूस फिरण्यासाठी या पाच दिवसांनंतरच बाहेर पडतात. यामुळे बाहेर गावाहून आलेले विविध विक्रेते पुढील चार-पाच दिवस दुकाने कायम ठेवतात. यामुळे हा कालावधी दहा दिवसांच्या पुढे जातो. या वर्षीच्या उरुसात दरवर्षी होणारे कृषी संजीवनी प्रदर्शनही घेण्यात आलेले नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेने आयोजित केलेल्या महिला बचत गट उत्पादित वस्तंूचे विक्री प्रदर्शनाला प्रतिसाद लाभला. मात्र, विविधतेचा अभाव, कमी प्रमाणातील स्टॉल, कृषी विभागाचे जुजबी प्रदर्शन यामुळे येथे भेट देणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गहिनीनाथ कृषी विज्ञान मंडळ आयोजित ऊस पीक स्पर्धेस शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला.
उरुसाच्या मुख्य दिवशी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांना तसेच गैबी दर्ग्यात कव्वाली जुगलबंदी पाहण्यासाठी गर्दी झाली होती. संत रोहिदास शाळेच्या पटांगणातील पारंपरिक लोकनाट्य तमाशालाही प्रतिसाद मिळाला.
कागल एस.टी. आगार, के.एम.टी. बसेस यांनी जादा गाड्या सोडून प्रवाशांची सोय केली. मंगळवारी पहाटे मानाचा घाटगे घराण्याचा गलेफ पालखीतून वाजतगाजत आणण्यात आला. या गलेफाबरोबर वीरेंद्रसिंह घाटगे उपस्थित होते, तर समरजितसिंह घाटगे यांनी प्रथेप्रमाणे पिराचे दर्शन घेऊन विधीवत प्रार्थना केली. यावेळी पारंपरिक नगारा वाजविण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Gahinath Gabi Peer urus enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.