माडगुळेत १७ जानेवारीला ‘गदिमा महाेत्सव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:36+5:302021-01-08T05:22:36+5:30
————————————————————— कोल्हापूर जिल्ह्यात तलवार हल्ल्यात दोन गंभीर जखमी पेठवडगाव : खोची (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे मुलीला मोबाईल देत ...

माडगुळेत १७ जानेवारीला ‘गदिमा महाेत्सव’
—————————————————————
कोल्हापूर जिल्ह्यात तलवार हल्ल्यात दोन गंभीर जखमी
पेठवडगाव : खोची (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे मुलीला मोबाईल देत छेड काढल्याचा जाब विचारण्याच्या कारणावरून दोन गटांत मारामारी झाली. तलवार, काठीने मारहाण करून दोघांना जखमी केल्याप्रकरणी तीनजणांच्या विरोधात वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
—————————————————————
डंपरची माेटारीस धडक
मिरज (सांगली) : म्हैसाळ-बेडग आडव्या रस्त्यावर डंपरने मोटारीला ठोकरल्याने डॉ. ओंकार वाले (वय ३५, रा. मिरज) हे जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असलेले पोलीस कर्मचारी सनी स्वामी (वय ३२) हे गंभीर जखमी झाले. स्वामी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.
—————————————————————
माडगुळेत १७ जानेवारीला ‘गदिमा महाेत्सव’
आटपाडी (सांगली) : थोर साहित्यिक व आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त २८ वा गदिमा काव्य महोत्सव दि. १७ जानेवारीला माडगुुुळे (ता. आटपाडी) येथेे आयोजित करण्यात आला आहे. नारायण सुर्वे कला अकादमी, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-आटपाडी, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-भोसरी व माडगुळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होणार आहे.
—————————————————————
मच्छिमारांच्या डिझेलमध्ये भेसळ, नमुने प्रयोगशाळेत
रत्नागिरी : मासेमारी नौकांना पुरवठा करण्यात येणारे डिझेल भेसळयुक्त असल्याच्या तक्रारीनंतर तहसीलदारांकडून मिरकरवाडा जेटीवरील एका मच्छिमार संस्थेच्या डिझेल टाकीवर छापा टाकण्यात आला. त्यानंतर त्यातील डिझेलचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या प्रकारामुळे मच्छिमारांमध्ये खळबळ उडाली आहे.
—————————————————————
अवैध दारू वाहतूक करताना सोलापूरच्या दोघांना अटक
आंबोली (जि. सिंधुदुर्ग) : आंबोली पोलिसांनी तपासणी नाक्यावर गोवा बनावटीची अवैध दारू रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पकडली. या अवैध दारू वाहतूकप्रकरणी सोलापूर येथील प्रवीण महावीर बोराडे (वय २५) आणि सज्जन बोराडे (४५) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आंबोली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून स्कॉर्पिओ गाडीसह ९ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
—————————————————————
बाजारपेठेत आग लागून दोन दुकाने भस्मसात
कणकवली (सिंधुदुर्ग) : कणकवली बाजारपेठेतील अत्यंत दुर्मीळ औषधांचा साठा असलेले आणि १२८ वर्षांची परंपरा जोपासणारे रामचंद्र बाबाजीशेठ उचले किराणा, आयुर्वेदिक दुकान सोमवारी पहाटे आगीत जळून खाक झाले. त्याचबरोबर जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊसही या आगीत भस्मसात झाले. कोल्ड्रिंक्स हाऊसशेजारील अंधारी ब्रदर्स यांचे दुकान व राहत्या घरालाही आगीची झळ पोहोचली आहे. या आगीत लाखो रुपयांची हानी झाली आहे.
—————————————————————
मिरजेत बदकाची मुक्तता
सांगली : हिवाळ्यात स्थलांतर करून आलेले परदेशी पक्षी शिकाऱ्यांचे बळी ठरत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत पक्ष्यांच्या अवैध शिकारीच्या चार घटना उघडकीस आल्या. रविवारी दुपारी वड्डी (ता. मिरज) परिसरातील ओढ्यातून एका हळदी-कुंकू बदकाला पकडून चिकन विक्रेत्याकडे विक्रीसाठी शिकारी घेऊन आला होता. विक्रेत्याने याची माहिती पक्षीप्रेमींना दिल्यानंतर, त्या बदकाला त्यांनी ताब्यात घेतले व एका नाल्यातील पाण्यात पुन्हा मुक्त केले. यावेळी शिकाऱ्याला ताकीद देऊन सोडले.
०४०१२०२१-बदक (फोटो)