गडहिंग्लज तालुक्यातही बिबट्याचा वावर, तेगिनहाळमध्ये दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 19:42 IST2020-09-11T19:41:32+5:302020-09-11T19:42:36+5:30
गडहिंग्लज तालुक्यात पहिल्यांदाच बिबट्याने दर्शन दिले आहे. तेगिनहाळ येथील शेतवडीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत घबराहट निर्माण झाली आहे.

तेगिनहाळ (ता. गडहिंग्लज) येथील सोयाबीनच्या शेतवडीत आढळून आलेले बिबट्याच्या पायाचे ठसे.
गडहिंग्लज :गडहिंग्लज तालुक्यात पहिल्यांदाच बिबट्याने दर्शन दिले आहे. तेगिनहाळ येथील शेतवडीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत घबराहट निर्माण झाली आहे.
तेगिनहाळ येथील शेतकरी सागर नौकुडकर हे पत्नीसह भांगलणीसाठी शेतात गेले होते. त्यावेळी त्यांना अचानकपणे सोयाबीनच्या पिकात अंगावर ठिपके असलेला प्राणी दिसला. त्यामुळे घाबरून ते कोणतीही हालचाल न करता आहे तिथेच थांबले. तो प्राणी समोरून गेल्यानंतर ते घरी परतले. त्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना त्याची माहिती दिली.
ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर वनपाल बी. एल. कुंभार, वनरक्षक रणजीत पाटील यांनी तेगिनहाळला भेट देवून पाहणी केली. त्यावेळी त्यांना सोयाबीनच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यावरून तेगिनहाळ परिसरात त्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तेगिनहाळ गावात दवंडी देवून सावधानतेचा इशारा दिला. ग्रामस्थांनी शेताकडे एकट्याने जावू नये. शेतवडीत राहणाऱ्यांनी जनावरांचे गोठे बंदिस्त करून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
बिबट्या पहिल्यांदाच..!
२००५ मध्ये किल्ले सामानगड परिसरात पहिल्यांदाच हत्तीचा कळप येवून गेला होता. कांही ठिकाणी जंगली गवे व तरस आणि इतर वन्यप्राण्यांचे दर्शन वारंवार होत असते. बिबट्याचे दर्शन कधीही झालेले नव्हते. परंतु, पायाच्या ठस्यावरून तो प्राणी बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाल्याने तेगिनहाळसह आजूबाजूच्या गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.