आजऱ्यात बैतुलमाल कमिटीकडून कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:13+5:302021-06-09T04:30:13+5:30

आजरा : कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना अनेक वेळा अडचणी येतात. काही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाइकही येत नाहीत. ...

Funeral on Corona dead by Betulmal Committee in Ajara | आजऱ्यात बैतुलमाल कमिटीकडून कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार

आजऱ्यात बैतुलमाल कमिटीकडून कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार

आजरा : कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना अनेक वेळा अडचणी येतात. काही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाइकही येत नाहीत. अशावेळी मृतदेहांवर ज्या-त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आजऱ्यातील बैतुलमाल कमिटीने घेतली आहे. जाती-धर्माचे बंधन झुगारून कोरोनाने मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार होत असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आजरा तालुक्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यातील तब्बल ६१ जणांना कोरोनाने जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कारास कोणीही पुढे येत नाहीत. मयताचे नातेवाईकही अंत्यसंस्कारावेळी पाठ फिरवतात. कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीजवळ कोणीही जात नाहीत. मयताला शेवटचे पाणी घालायलाही कोणी जात नाहीत. अशा वेळी बैतुलमाल कमिटीचे सदस्य जाती-धर्माचे बंधन झुगारून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येत आहेत.

सोमवारी आजरा तालुक्यातील खेडे येथील एका रुग्णांचे निधन झाले. त्यांच्या नातेवाइकांच्या व गावच्या सुरक्षेच्या कारणास्तव आजरा येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी अंत्यसंस्कारासाठी मंजूर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली बैतुलमाल कमिटीच्या सदस्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

मृताच्या नातेवाइकांनीही मोलाचे सहकार्य केले. आजरा कोविड सेंटरमध्ये मयत झाल्यानंतर स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करेपर्यंत बैतुलमाल कमिटीचे सदस्य आमीन लमतुरे, साजिद खतीब, जावेद चाँद, तौसिफ मुजावर, आसिफ मुल्ला, जुबेर माणगावकर, अब्दुल रज्जाक खलिफ, आयाज माणगावकर, जुबेर सोनेखान, ताहीर तकीलदार, जहीर माणगावकर यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.

कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पार पाडत असल्याबद्दल आजऱ्यातील बैतुलमाल कमिटीच्या सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Funeral on Corona dead by Betulmal Committee in Ajara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.