अंदाजपत्रकातील निधी विकासकामांकरिता द्यावा, माजी पदाधिकाऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST2020-12-24T04:22:34+5:302020-12-24T04:22:34+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सन २०१९ - २० तसेच सन २०२० - २१मधील अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेला निधी विकासकामांकरिता तत्काळ ...

अंदाजपत्रकातील निधी विकासकामांकरिता द्यावा, माजी पदाधिकाऱ्यांची मागणी
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सन २०१९ - २० तसेच सन २०२० - २१मधील अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेला निधी विकासकामांकरिता तत्काळ सोडण्यात यावा, अशी आग्रही मागणी माजी पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. गेल्या दोन वर्षात विकासकामांना स्वनिधी देण्यात आलेला नाही, त्यामुळे कर भरतो, पण कामे केली जात नाहीत, असा संदेश नागरिकांमध्ये गेला तर कर संकलनावर त्याचा परिणाम होईल, अशी भीती त्यांनी प्रशासनाला घातली.
माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, आश्पाक आजरेकर, दिग्विजय मगदूम, शिवानंद बनछोडे यांच्या शिष्टमंडळाने प्रशासक बलकवडे यांची बुधवारी सायंकाळी भेट घेतली. सन २०१९ - २० तसेच २०२० - २१ या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेला विकासकामांचा निधी अद्याप सोडलेला नाही. त्यामुळे त्या त्या वेळी धरण्यात आलेली कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तीव्र नाराजीला सामोरे जावे लागत आहे. हा निधी तत्काळ सोडून कामे सुरु करावीत, असा आग्रह शिष्टमंडळाने धरला.
नागरिकांकडून आपण कर घेत असताना त्यांच्याशी निगडीत कामे करत नसलो तर त्याचा पुढील काळात कर संकलनावर परिणाम होऊ शकतो. केवळ कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठीच महापालिका कर गोळा करते, असा नागरिकांचा समज होऊ नये, असे देशमुख यांनी प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिले. पावसाळ्यात शहराच्या विविध भागात पाणी साचून राहाते, त्याच्या निर्गतीकरिता अडीच कोटींचा निधी देण्यात आला आहे. ही कामेही आता सुरु होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, लेखा परीक्षक संजय सरनाईक उपस्थित होते.
फोटो क्रमांक - २३१२२०२०-कोल-केएमसी
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतूद करण्यात आलेला निधी विकासकामांकरिता सोडण्यात यावा, अशी मागणी माजी पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.