शेतकरी संघासाठी मोर्चेबांधणी

By Admin | Updated: February 24, 2015 00:01 IST2015-02-23T21:35:41+5:302015-02-24T00:01:11+5:30

निवडणुक हालचाली : कच्ची यादी निबंधक कार्यालयाने मागवली

Frontline for Farmer's Team | शेतकरी संघासाठी मोर्चेबांधणी

शेतकरी संघासाठी मोर्चेबांधणी

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी निबंधक कार्यालयाने सुरू केली आहे. संघाच्या व्यक्ती सभासदांची कच्ची मतदार यादी मागविण्यात आली असून येत्या दोन दिवसांत ती प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर संघाशी संलग्न विकास सेवा संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्याची प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे. मागील निवडणुकीत शेतकरी संघाची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही निवडणूक झाली होती. सत्तारुढ गटाने एकतर्फी निवडणूक जिंकली होती. गेल्या पाच वर्षांत संघाची स्थिती चांगली झालेली आहे. संचालकांनी काटकसरीचा कारभार करत अनेक बंद पडलेल्या शाखा पूर्ववत सुरू करून उत्पन्नाचे स्रोत पुन्हा सुरू केले आहेत. त्यामुळे संघाची आर्थिक घडी सुरळीत होण्यास मदत झाली आहे. गेल्या निवडणुकीत १७ जागा होत्या, १६ संचालकांसह कार्यकारी संचालक ही सभासदांनीच निवडून द्यायचा, असा पोटनियम होता. पण ९७ व्या घटना दुरूस्तीने १९ जागा झालेल्या आहेत. यामध्ये कार्यकारी संचालक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रतिनिधी कमी केले आहेत. त्यामुळे आता सात प्रतिनिधी विकास सेवा संस्था व सात व्यक्ती सभासदांमधून निवडून येणार आहेत. त्याशिवाय पाच ‘राखीव प्रतिनिधी’ही निवडले जाणार आहेत. संघाशी संलग्न सुमारे १२०० विकास सेवा संस्था तर २८५०० व्यक्ती सभासद आहेत. मतदारसंख्या जास्त असल्याने प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागते. (प्रतिनिधी)

प्रारुप मतदार यादी प्रक्रीया दोन दिवसात
येत्या दोन-तीन दिवसांत संघाच्या प्रारूप मतदारयादीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. संघाकडून व्यक्ती सभासदांची प्रारूप यादी मागितली आहे. त्याचबरोबर विकास सेवा संस्थांचे प्रतिनिधींची नावे पाठविण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे.


जागांची संख्या
विकास सेवा संस्था प्रतिनिधी - ७
व्यक्ती सभासद प्रतिनिधी - ७
महिला प्रतिनिधी - २
अनुसूचित जाती/जमाती - १
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी - १
भटक्या विमुक्त जाती/जमाती - १

Web Title: Frontline for Farmer's Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.