एफआरपीसाठी १६ रोजी मोर्चा

By Admin | Updated: September 29, 2015 00:54 IST2015-09-29T00:53:20+5:302015-09-29T00:54:48+5:30

राजू शेट्टी : दराचे तुकडे केले तर हातात दांडके

Front for the FRP on 16th | एफआरपीसाठी १६ रोजी मोर्चा

एफआरपीसाठी १६ रोजी मोर्चा


सांगली / शिरोळ : कायद्यातील तरतुदीप्रमाणे एफआरपी एकरकमी द्यायला हवी. जर एफआरपीचे तुकडे केले, तर साखर कारखानदार आणि सरकारविरोधात हाती दांडके घेऊन पुन्हा ताकद दाखवावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला. साखर सहसंचालकांच्या कोल्हापुरातील कार्यालयावर १६ आॅक्टोबरला मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
ते म्हणाले की, साखर कारखानदारांनी सर्वसाधारण सभेत ठराव करून एफआरपी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक सर्वसाधारण सभांना पहिल्या रांगांमध्ये पोसलेले गुंड व टगेच बसविले जातात. त्यामुळे खऱ्या शेतकरी सभासदाला कधीच मत मांडता येत नाही. त्यामुळे अशा ठरावांविरोधात आम्ही शेतकऱ्यांच्या अर्जांची मोहीम सुरू करणार आहोत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात असे अर्ज पोहोच केले जातील. एकरकमी एफआरपी न देणाऱ्या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी या अर्जाद्वारे केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना हा अर्ज भरायचा नाही, त्यांनी खुशाल चार किंवा पाच हप्त्यात एफआरपी घ्यावी. कारखान्यांच्या ठरावानुसार सरकार निर्णय घेणार, की शेतकऱ्यांच्या अर्जानुसार, हे आम्हाला पाहायचे आहे. नियमानुसार एफआरपीचे तुकडे पाडता येत नाहीत. तरीही जर तुकडे पाडलेच, तर आम्ही सरकारला व कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी हाती दांडके घेऊ. केंद्र शासनाने एकदा शेतकऱ्यांचा हिसका पाहिला आहे, त्यामुळे ते पुन्हा आमच्या नादी लागतील, असे वाटत नाही. कोल्हापुरात होणारे आंदोलन नंतर राज्यभरात छेडले जाईल. विभागीय सहसंचालकांकडे मोर्चे काढून राज्यभर या प्रश्नावर आम्ही लढा पुकारणार आहोत. बांधावर शेतकऱ्यांना माल विकण्याची मुभा मिळाल्यानंतर कोणी बोटे मोडायचे कारण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल, तर अशा निर्णयांना आमचा पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

निर्यातीचे धोरण हवे
हंगाम संपल्यानंतर निर्यातीचे धोरण ठरवून उपयोग नाही. हंगामापूर्वीच सरकारने याबाबतचे धोरण ठरवावे, अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Front for the FRP on 16th