कापड खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक
By Admin | Updated: October 18, 2015 23:43 IST2015-10-18T23:24:35+5:302015-10-18T23:43:23+5:30
इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात खळबळ : कोट्यवधी रुपयांची फसवणूक; कापड उत्पादक यंत्रमागधारक अस्वस्थ

कापड खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक
राजाराम पाटील-इचलकरंजीकापड खरेदी-विक्रीच्या व्यवहारात यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढू लागल्याने येथील वस्त्रोद्योगात खळबळ माजली आहे. आधीच मंदीमुळे आर्थिक फटका बसत असल्याने यंत्रमागधारक आणखीनच त्रस्त झाला आहे. देशातील एकूण यंत्रमागांपैकी निम्म्याहून अधिक यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. शेतीखालोखाल असलेल्या या वस्त्रोद्योगात होणाऱ्या तेजी-मंदीचा परिणाम येथे अधिक जाणवतो. गुजरात राज्यातही बऱ्यापैकी वस्त्रोद्योग आहे. त्यामुळे गुजरातमधून निवडून गेलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे वस्त्रोद्योगाला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती; पण गेले वर्ष वस्त्रोद्योगाला काही चांगले गेले नाही. आर्थिक मंदीच्या फेऱ्यात हा उद्योग सापडला आहे.
अशा परिस्थितीत यंत्रमाग कामगारांच्या सुधारित किमान वेतनाच्या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगारांचा ३१ जुलैला सुरू झालेला संप ५२ दिवस चालला. त्या काळात इचलकरंजीतील सुमारे ४५०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली. यामुळे येथील आर्थिक घडी विस्कटली. त्यानंतर सायझिंग कारखाने सुरू झाले; पण अवघ्या दोन आठवड्यांतच पुन्हा मंदीची तीव्रता जाणवू लागली. सध्या इचलकरंजीतील सायझिंग कारखाने आठवड्यातील तीन दिवस बंद राहत आहेत. म्हणजे शहरातील ३५ टक्के कापड उत्पादन घटले आहे.वस्त्रोद्योगातील कमालीच्या मंदीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक तंगी जाणवत असताना येथील काही यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांना दिल्ली येथील एका फर्मने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. प्रथम विश्वास संपादन करून त्यानंतर मोठ्या प्रमाणात कापड माल घेत पेमेंट न देण्याची पद्धत यावेळीही अवलंबली गेली. त्याचप्रमाणे शहरातील विरार-मुंबई येथील मोदी नावाच्या तथाकथित कापड व्यापाऱ्याने गेले दीड वर्ष शर्टिंग-शूटिंग, ड्रेस मटेरियल अशा विविध प्रकारच्या कापडाची खरेदी केली. त्याचे पेमेंटही दिले; पण आता शहरातील ११ कापड व्यापाऱ्यांकडून व दोन-तीन यंत्रमागधारकांकडून सात कोटी रुपयांच्या खरेदी केलेल्या कापडाचे पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या या प्रकरणाची व्याप्ती वाढू लागल्याने येथील वस्त्रोद्योगामध्ये जोरदार खळबळ उडाली आहे.
सतत सावधगिरीची आवश्यकता : कोष्टी
परपेठांतील कापड व्यापारी फर्मकडून होणाऱ्या फसवणुकीबाबत बोलताना इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी म्हणाले, कापड खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नेहमीच सावधगिरी बाळगली पाहिजे. त्याचप्रमाणे पोलिसांनीसुद्धा परपेठांमधून होणाऱ्या व्यापाऱ्यांकडून फसवेगिरी झाल्याचे
प्रकरण उघडकीस आल्यास जलद हालचाली करून संबंधितांवर कडक कारवाई केली पाहिजे, ज्यामुळे इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाबाबत व्यापार व्यवसायासाठी चांगली प्रतिमा तयार होण्याबरोबरच गैरवर्तनासाठी येथील पोलिसांचा वचकही गुन्हेगारांवर निर्माण होईल.
दीपावलीनंतर वस्त्रोद्योगात
सुधारणा : महाजन
दीपावलीनंतर वस्त्रोद्योगातील कापडाची मागणी वाढेल. व्यापार व्यवसाय सुधारण्याची संधी असल्याची माहिती यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी सांगितली. ते म्हणाले, यंत्रमाग उद्योगामधील वाढीव वीजदराचा फटका यंत्रमागधारकांना बसला आहे. त्यामुळे आणि मंदीच्या वातावरणामुळे कापड उत्पादनात सुमारे तीस टक्के घट झाली आहे. आॅटोलूम कारखानदारांचा जॉबरेटसुद्धा प्रतिमीटर दहा ते अकरा पैशांवर आल्यामुळे नुकसान होऊ लागले आहे. मात्र, डिसेंबरपासून कापड उद्योगामध्ये चांगले दिवस येण्याची आशा आहे.