पंचगंगेत बुडणाऱ्या लातूरच्या चार महिलांना वाचवले, नदी घाटावर मारुती मंदिराजवळची घटना
By उद्धव गोडसे | Updated: May 13, 2023 19:00 IST2023-05-13T18:59:56+5:302023-05-13T19:00:22+5:30
जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी काढले बाहेर.

पंचगंगेत बुडणाऱ्या लातूरच्या चार महिलांना वाचवले, नदी घाटावर मारुती मंदिराजवळची घटना
कोल्हापूर : पर्यटन आणि देवदर्शनासाठी कोल्हापुरात आलेल्या लातूर जिल्ह्यातील चार महिला पंचगंगा नदीत बुडता-बुडता बचावल्या. प्रसंगावधान राखून जीवरक्षक उदय निंबाळकर आणि काही नागरिकांनी चारही महिलांना पाण्यातून बाहेर काढले. यातील दोन महिलांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. हा प्रकार शनिवारी (दि. १३) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.
जीवरक्षक उदय निंबाळकर आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील आरणी येथील नऊ जण जण शनिवारी सकाळी पर्यटन आणि देवदर्शनासाठी कोल्हापुरात पोहोचले. पंचगंगा नदीत आंघोळ करून ते जोतिबाला जाणारा होते. पंचगंगा नदीवर पोहोचल्यानंतर यातील काही महिला आंघोळीसाठी गेल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने माधुरी दत्ता आंबाडे (वय २५, रा. आरणी, जि. लातूर) या बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी कोमल सुरेश क्षीरसागर (वय ३५), शामल राजकुमार क्षीरसागर (वय ५०) आणि मंगल सुरेश मगर (वय ४५, सर्व रा. आरणी, जि. लातूर) या तिघी पाण्यात उतरल्या. मात्र, या तिघीही खोल पाण्यात गेल्याने त्यांनी आरडा-ओरडा सुरू केला.
मॉर्निंग वॉकसाठी पंचगंगा नदी घाटावर गेलेले जीवरक्षक उदय निंबाळकर यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने पाण्याकडे धाव घेऊन आमीर शेख, विनायक जाधव यांच्या मदतीने इनर ट्यूबद्वारे बुडणा-या महिलांना पाण्याबाहेर काढले. चारही महिलांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. यातील माधुरी आंबाडे आणि कोमल क्षीरसागर यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्या अत्यवस्थ बनल्या होत्या. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.