पोपट पवारकोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठीची प्रभागरचना बुधवारी जाहीर झाल्याने साडेचार वर्षांनंतर महापालिका निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात होणार आहे. एका प्रभागात चार सदस्य निवडून द्यायचे असल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी असेल. महायुती व महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कोल्हापूर महापालिका निवडणुकीतही राबविला जाण्याची शक्यता असल्याने इच्छुकांच्या नाकदुऱ्या काढताना नेत्यांचीच कसोटी लागणार आहे.राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या काही वर्षे आधीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महापालिकेत एकत्र आले होते. मात्र, मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आधीच केली आहे. त्यामुळे मागील पंचवार्षिकमध्ये एकत्रित सत्तेवर असणारे काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गट महापालिकेत एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे.
वाचा - हक्काचे पॉकेट बदलल्याने निवडणूक आव्हानात्मक; २८ हजार लोकसंख्येचा एक प्रभागमहापालिकेच्या राजकारणात भाजप आणि शिंदेसेनेमध्येही तितकेसे आलबेल नाही. त्यामुळे महायुती म्हणून एकाच झेंड्याखाली येणाऱ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना उमेदवारी देताना मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.काँग्रेसचाही लागणार कसमहाविकास आघाडीत महापालिकेच्या राजकारणात काँग्रेस सर्वांत प्रबळ आहे. काँग्रेसला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, उद्धवसेना यांची साथ असेल. मात्र, या दोन्ही पक्षांना सोबत घेताना त्यांना किती जागा द्यायच्या यावरूनही तानेबाने होणार आहेत. महाविकास आघाडी म्हणून आपसह डाव्या पक्षांनी जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेससोबत राहणे पसंत केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत या पक्षांना सोबत घेताना त्यांचाही सन्मान राखण्याचे आव्हान काँग्रेससमोर असणार आहे.
असे होते २०१५ मधील बलाबल
- काँग्रेस - ३०
- राष्ट्रवादी - १५
- शिवसेना - ०४
- ताराराणी आघाडी - १९
- भाजप - १३
- एकूण जागा - ८१