उद्योजकांची चार दिवसांची डेडलाईन

By Admin | Updated: January 17, 2015 00:06 IST2015-01-17T00:06:01+5:302015-01-17T00:06:57+5:30

वीज दरवाढ प्रकरण : शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटणार

Four days deadline for entrepreneurs | उद्योजकांची चार दिवसांची डेडलाईन

उद्योजकांची चार दिवसांची डेडलाईन

कुपवाड : जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांना करण्यात आलेल्या वीज दरवाढीप्रकरणी शासनाला सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पुन्हा चार दिवसांची डेडलाईन देण्यात आली आहे़ सविस्तर चर्चेसाठी येत्या मंगळवारी आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखालील उद्योजकांचे शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांची भेट घेणार आहे़ त्यानंतरही चांगला निर्णय न झाल्यास उद्योजकांनी मोर्चा काढण्याबरोबरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़
राज्यातील औद्योगिक ग्राहकांना शासनाकडून विजेसाठी देण्यात येणारे ७०६ कोटींचे अनुदान बंद करण्यात आले़ महावितरणकडून सर्वाधिक दरवाढ करण्यात आली़ त्यामुळे नाराज उद्योजकांनी दरवाढीचा निषेध नोंदवून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मिरजेत चार दिवसांपूर्वी आ़ खाडे व राज्य वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेतली़ त्यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत बैठक घेण्याचे ठरले होते़ परंतु, ऊर्जामंत्र्यांनी खाडे यांना २० जानेवारी रोजीची वेळ दिल्यामुळे उद्योजकांनी पुन्हा चार दिवसांची डेडलाईन शासनाला दिली आहे़ त्यानंतर वीजदरवाढीसंदर्भात निर्णय न झाल्यास, मोर्चासह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष शिवाजी पाटील, उपाध्यक्ष रमेश आरवाडे, माजी उपाध्यक्ष सतीश मालू, सचिव पांडुरंग रूपनर यांनी दिला आहे़ (वार्ताहर)

...अन्यथा आंदोलन छेडणार
याबाबत सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके म्हणाले की, महावितरणने सर्वाधिक दरवाढ केली आहे़ यासंदर्भात आ़ खाडे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या संपर्कात आहोत़ मंगळवारी त्यांची भेट होईल़ त्यांना विषयाचे गांभीर्य कळाले आहे़ शासनाने ही वाढ कमी करावी, अन्यथा, आंदोलन करावे लागेल.

Web Title: Four days deadline for entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.