कोल्हापूर : जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी बेळगावहून आलेल्या भाविकाचा केर्ली ते जोतिबा मार्गावर गायमुखजवळ पाण्याच्या टँकरखाली सापडून मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. ३) दुपारी दोनच्या सुमारास झाला. गणेश सुभाष दुराई (वय २२, रा. शिवाजीनगर, बेळगाव) असे मृताचे नाव आहे.सीपीआरच्या अपघात विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावातील आठ ते दहा तरुण चैत्र यात्रेच्या निमित्ताने रविवारी (दि. २) रात्री कोल्हापुरात आले होते. सोमवारी सकाळी गायमुखजवळ पार्किंग तळावर टेम्पो पार्क करून ते चालत जोतिबा डोंगरावर गेले. देवदर्शनानंतर ते पुन्हा गायमुखाकडे आले. दुपारी जेवणासाठी डोंगरावर जाताना त्यांनी डोंगरावर निघालेल्या एका पाण्याच्या टँकरला हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला. चालत्या टँकरमध्ये बसण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन पडलेला गणेश टँकरच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला.जखमी गणेश याला त्याचा सख्खा भाऊ निखिल आणि मित्रांनी तातडीने रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्घटनेची माहिती मिळताच बेळगाव आणि परिसरातून जोतिबा यात्रेसाठी आलेल्या भाविकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
टँकरखाली सापडून भाविकाचा मृत्यू, जोतिबाचे दर्शन घेवून परतताना घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 12:40 IST