सौभाग्यवतींना उमेदवारीसाठी रस्सीखेच, काँग्रेस-सेनेकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:12+5:302021-01-08T05:14:12+5:30
कोल्हापूर : बदललेल्या प्रभाग रचनेनंतर गेल्यावेळेपासून अस्तित्वात आलेल्या व्हीनस कॉर्नर या १४ क्रमांकाच्या प्रभागात यावेळी खुल्या गटातील महिला ...

सौभाग्यवतींना उमेदवारीसाठी रस्सीखेच, काँग्रेस-सेनेकडे कल
कोल्हापूर : बदललेल्या प्रभाग रचनेनंतर गेल्यावेळेपासून अस्तित्वात आलेल्या व्हीनस कॉर्नर या १४ क्रमांकाच्या प्रभागात यावेळी खुल्या गटातील महिला आरक्षण पडल्याने आजी-माजी नगरसेवकांकडून सौभाग्यवतींचे कार्ड बाहेर काढण्यात आले आहे. इच्छुकांची संख्या आताच अर्धा डझनावर गेल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आजच्या घडीला काँग्रेस व शिवसेनेकडे इच्छुकांच्या रांगा लागल्याने बंडखोरीची आणि बहुरंगी लढतीची परंपरा यंदाही कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रभाग रचनेपूर्वी शहराचे महापाैरपद भूषविण्याची संधी सातत्याने मिळालेल्या या प्रभागाचा विस्तार लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉल ते महावीर कॉलेज सीपीआर चौक ते रेल्वेस्टेशन असा आहे. ६७०० मतदान असलेला हा प्रभाग कायमच पूरग्रस्त असतो. गेली सलग दोन वर्षे महापुराचा सामना केला आहे. या प्रभागावर आता शिवसेनेचे वर्चस्व आहे. गटनेते राहुल चव्हाण विद्यमान नगरसेवक आहेत. सेनेत बंडखोरी झाली असतानाही त्यांनी ताराराणीचे प्रकाश नाईकनवरे या मातब्बराचा पराभव करण्याची किमया केली. प्रभागरचनेनंतर येथे घुसघोरी केल्याने नाईकनवरे यांना घरी बसवायचेच, या भावनेतून अनेक गट एकत्र आले आणि त्यातून चव्हाण यांना पुढे चाल दिली गेली. या जोरावर पहिल्यांदाच निवडणूक लढवताना अवघ्या ५९ मतांनी विजयी होऊन के.एम.टी. सभापतीपदासह गटनेता पद देखील चव्हाण यांनी मिळवले.
आता महिला आरक्षण पडल्याने चव्हाण यांनी पत्नी स्नेहल यांच्यासाठी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसच्या यादीतही त्या आहेत, पण पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची त्यांची भूमिका आहे. शिवसेनेचे शशिकांत बिडकर यांनी मागीलवेळी बंडखोरी केली होती. यावेळी देखील त्यांच्या पत्नी मनीषा बीडकर यांचे नाव पुढे करत लढण्याची तयारी केली आहे. माजी महापौर प्रार्थना समर्थ यांनीही मैदानात उडी घेतली असून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अमर समर्थ यांनी प्रभागात बऱ्यापैकी वातावरणही केले आहे. प्रकाश नाईकनवरे यांच्या पत्नी प्रतिभा नाईकनवरे मैदानात येणार आहेत. मागील वेळी ताराराणीकडून निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली, पण थोडक्यात विजय हुकला होता. त्यांचे नाव काँग्रेसच्या यादीत देखील दिसत आहे. रश्मी अमर देसाई यांनीही काँग्रेसकडेच उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसने नाकारले तर राष्ट्रवादीचा पर्याय देखील अनेकांनी ठेवला आहे.
प्रभागातील झालेली कामे : पाटीलवाडा रस्त्याचे सध्या सुरू असलेले काम वगळता सर्व रस्ते, गटारीची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. पाणी व कचरा उठावाची फारशी समस्या दिसत नाही.
प्रभागातील शिल्लक असलेली कामे : महावीर गार्डनची दुरवस्था झाली आहे. स्टेशन रोड, असेंब्ली रोड, खानविलकर पेट्रोल पंपासमोरील रोड येथे खड्डेच खड्डे आहेत. सुतारवड्यात अद्याप रस्ता झालेला नाही.
प्रतिक्रिया...
माझा प्रभाग शंभर टक्के पूरग्रस्त असल्याने कामेही जास्त आहेत. कुटुंबांचे स्थलांतर, पुनर्वसनासह आवश्यक मदत, रस्ते, पाण्याच्या पायाभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. प्रभागातील जनता, तरुण मंडळांनी केलेल्या सहकार्यामुळे कामे पूर्णत्वास नेऊ शकलो.
राहुल चव्हाण, विद्यमान नगरसेवक (शिवसेना)
मागील निवडणुकीत उमेदवारांना पडलेली मते...
राहुल चव्हाण (शिवसेना) १६२९
प्रकाश नाईकनवरे (ताराराणी) १५७०
अकबर मोमीन (राष्ट्रवादी) २५८
शशिकांत बीडकर (अपक्ष) १४९