किल्ले सामानगडास अवकळा; सौंदर्य धोक्यात

By Admin | Updated: July 29, 2014 23:03 IST2014-07-29T21:11:31+5:302014-07-29T23:03:44+5:30

प्रेमीयुगुलांचा वावर : प्रचंड प्रमाणात बेकायदा वृक्षतोड; राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज

Forts; The danger of beauty | किल्ले सामानगडास अवकळा; सौंदर्य धोक्यात

किल्ले सामानगडास अवकळा; सौंदर्य धोक्यात

संजय थोरात - नूल , निसर्गाचे वरदान लाभलेला किल्ले सामानगड (ता. गडहिंग्लज) वनराईने नटलेला आहे. पर्यटनस्थळ विकास योजनेतून गडाचा कोट्यवधी रुपये खर्चून विकास झाला खरा; पण सध्या गडाला अवकळा आली आहे. गडावर प्रेमीयुगुलांचा वावर दिसत आहे. झाडाझुडपांनी अवशेष झाकल्याने गडाचे सौंदर्य धोक्यात आले आहे.
गडहिंग्लज तालुक्याच्या दक्षिण टोकास असणारा हा गड नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. शिलाहार घराण्यातील दुसरा राजा भोज याने १२व्या शतकात हा गड बांधला. १६७६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची डागडुजी केली. स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून पर्यटन विकास योजनेतून गडास ‘क’ वर्ग पर्यटनक्षेत्राचा दर्जा मिळाला. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी १ कोटी ३० लाख रुपये खर्चून गडाचा कायापालट करण्यात आला. तेव्हापासून हा गड पर्यटनाच्या नकाशावर झळकला.
सध्या गडावर पुरातन हनुमान मंदिर, सत्पुरुष भीमशाप्पा यांची समाधी, शिवलिंग मंदिर, भवानी मातेचे मंदिर आहे. गडावरील हनुमान मंदिर, अंधार कोठडी, हनुमान विहीर, साखर विहीर, वेताळ बुरूज, सोंडी बुरूज, झेंडा बुरूज ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
गडावरून गडहिंग्लज शहर, कारखाना, हिडकल प्रकल्प, वल्लभगड, गुड्डाई अशी ठिकाणे दिसतात. त्यामुळे आंबोलीला जाणारे पर्यटक वर्षा सहलीला गडावर येतात. मात्र, गडाचे वेळीच संवर्धन होणे गरजेचे आहे.
गडाच्या पावित्र्याला धोका...
गडावर महाविद्यालयीन प्रेमीयुगुलांची जोडपी पाहावयास मिळतात. या युगुलांच्या चाळ्यांमुळे गडाचे पावित्र्य धोक्यात येत आहे. सध्या गडास सार्वजनिक बांधकाम खाते, वनविभाग, पुरातत्व खाते यांपैकी कोणी वाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘गड’ नेमका कुणाच्या ताब्यात आहे, असा प्रश्न पडतो. जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी गडाच्या दुरवस्थेत लक्ष घालावे, अशी इतिहासप्रेमी व पर्यटकांची मागणी आहे.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...
बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गडावर भग्नावस्था निर्माण झाली आहे. अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अंतर्गत रस्ते उखडले आहेत. गडाचे प्रमुख आकर्षण असलेली हनुमान विहीर, अंधार कोठडी, साखर विहिरीवर मोठमोठी झुडपे उगवली आहेत. त्यामुळे बांधकामास धोका निर्माण झाला आहे. विहिरीही अस्पष्ट दिसतात. बालोद्यानातील खेळणी उद्ध्वस्त झाली आहेत. या उद्यानात जनावरे चरण्यासाठी सोडली जातात. विश्रांतिगृह वर्षानुवर्षे बंदिस्त आहे. डॉर्मेट्री हॉल, उपाहारगृहाची दुरवस्था झाली आहे.

Web Title: Forts; The danger of beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.