Kolhapur Politics: विधानसभेला एक झेंडा...आता दुसराच अजेंडा; आगामी निवडणुकीत पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकणार
By पोपट केशव पवार | Updated: November 1, 2025 18:57 IST2025-11-01T18:55:10+5:302025-11-01T18:57:21+5:30
ज्या पक्षाचे उपरणे आता गळ्यात टाकले आहे, त्याच पक्षाविरोधात निवडणुकीच्या रणधुमाळीत या आयाराम-गयारामांनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून दिली होती

Kolhapur Politics: विधानसभेला एक झेंडा...आता दुसराच अजेंडा; आगामी निवडणुकीत पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकणार
पोपट पवार
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पक्षाच्या प्रति असणारी निष्ठा गुंडाळून ठेवत काही दिवसांतच थेट सत्ताधारी पक्षासोबत घरोबा केला आहे. ज्या पक्षाचे उपरणे आता गळ्यात टाकले आहे, त्याच पक्षाविरोधात निवडणुकीच्या रणधुमाळीत या आयाराम-गयारामांनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवून दिली होती. मात्र, इतके करूनही अंगाला गुलाल न लागल्याने या नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वळचण पकडली असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, विधानसभेला एका पक्षाचा झेंडा घेऊन ज्यांच्या विरोधात लढले त्याच नेत्यांबरोबर आता ते सत्ताधारी म्हणून मांडीला मांडी लावून बसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र हेच नेते पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकणार असल्याने राजकीय पटलावरचे हे पाणी किती वळण घेणार याचीच उत्सुकता आहे.
कें. पीं.ची अशीही निष्ठा
राधानगरी मतदारसंघातून उद्धवसेनेची मशाल घेऊन लढलेले माजी आमदार के. पी. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धुरळा खाली बसायच्या आतच सत्ताधारी अजित पवार गटात प्रवेश करून आपली पुढील दिशाही स्पष्ट केली. त्यामुळे अगदी एक-दोन महिन्यांपुरतीच त्यांनी उद्धवसेनेपुरती निष्ठा वाहिल्याचे दिसून आले. याच मतदारसंघातून अपक्ष रिंगणात उतरलेल्या ए. वाय. पाटील यांनी निवडणुकीनंतर सत्ताधारी अजित पवार गटाशी मेतकूट जुळवले आहे.
राहुल यांनीही वाजवली घड्याळाची टिकटिक
करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लढलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. घड्याळ हातात बांधण्यासाठी त्यांनी भोगावती कारखान्याचे निमित्त पुढे केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील माजी आमदार पी. एन. पाटील यांची ओळख निष्ठेचे दुसरे नाव अशी राज्यभर होती. त्यांनी सहा विधानसभा निवडणुका लढल्या आणि चारवेळा पराभूत झाले. परंतु, तरीही एक लाख मतांचा गठ्ठा त्यांनी कधी हलू दिला नाही. संघर्ष करत राहिले, परंतु त्यांनी पक्षबदलाचा विचार कधी मनाला शिवू दिला नाही. याउलट व्यवहार राहुल पाटील यांच्याकडून झाला.
मिणचेकरांचा उद्धवसेना व्हाया स्वाभिमानी ते शिंदेसेना प्रवास
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून स्वभिमानीकडून उमेदवार असलेले माजी आमदार सुजित मिणचेकर यांनीही शिंदेसेनेचा धनुष्यबाण ताणला आहे. उद्धवसेना व्हाया स्वाभिमानी ते शिंदेसेना असा त्यांचा वर्षभरातला प्रवास राहिला आहे. उद्धवसेनेमुळेच त्यांच्या अंगावर दोनवेळा आमदारकीचा गुलाल पडला. परंतु, सत्तेच्या मोहात ते त्याला विसरले. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानीच्या तिकिटावर रणांगणात उतरलेले माजी आमदार उल्हास पाटील सध्या राजकीय विजनवासात आहेत. त्यांचाही प्रवास उद्धवसेना ते स्वभिमानी असाच राहिला आहे.