कोल्हापूर : माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटू लागले आहेत. आज, शनिवारी सकाळी माजी नगरसेवक रविकिरण इंगवलेंनी त्यांच्या समर्थकांसह राजेश क्षीरसागर यांचे शिवसेना फलकावरील त्याचे फोटो फाडले. यावरुन आता राजेश क्षीरसागर यांनी गुवाहाटी येथून व्हिडिओद्वारे मी कमजोर नाही. एकनाथ शिंदेंचा पठ्या आहे, सोडणार नाही असा इंगवलेंना इशारा दिला आहे.या व्हिडिओमध्ये क्षीरसागर यांनी म्हटले आहे की, शिवसेनेत गेल्या आठवड्यापासून ज्या घडामोडी सुरु आहेत याचा गैरफायदा काही जण घेत आहेत. वरिष्ठाच्या सुचनेनुसार कोल्हापुरातील स्वत:ला गुंड समजणारे, मात्र त्याच्यात काही दम नसलेल इंगवले माझे शिवसेना फलकावरील फोटो फाडत आहे. त्याला मी इतकाच इशारा देतो की, तू गुंड आहेस पण मी सुशिक्षित गुंड आहे. त्यामुळे बाकीचे सर्व खेळ बंद कर अन्यथा पळता भुई थोडी होईल असा इशारा दिला.इतकच नाही तर शिवसेनेसाठी गेल्या ३६ वर्षात माझे जे योगदान आहे ते बाकी कुणाचे नाही. शिवसेना मी घडवली. २००४ साली नारायण राणे गेले तेव्हा शिवसेना संपली होती त्यावेळी मी काय केलं ते मला माहित असेही त्यांनी ठणकाहून सांगितले. जर वैयक्तीक द्वेषाचा कोण फायदा घेत असेल तर अशा लोकांना पाठिशी घालू नका असे देखील त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.
मी एकनाथ शिंदेंचा पठ्ठ्या, सोडणार नाही; राजेश क्षीरसागरांचा रविकिरण इंगवलेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 16:36 IST