महाराष्ट्र हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आर. डी. आतकीरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:15+5:302021-06-28T04:17:15+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक व ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक राजाराम ज्ञानदेव तथा आर. डी. आतकीरे ...

महाराष्ट्र हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आर. डी. आतकीरे यांचे निधन
कोल्हापूर : महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक व ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक राजाराम ज्ञानदेव तथा आर. डी. आतकीरे यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य यु. आर. आतकिरे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, असा परिवार आहे.
आतकीरे हे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे खजानिस होते. गेली अनेक वर्षे संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने जिल्हा परिषदेने सन्मानित केले होते.
‘कोजिमाशि’चे ते संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते. उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता.
मूळचे मांगले, ता. शिराळा, जिल्हा सांगली येथील आतकीरे यांनी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या होस्टेलमध्ये राहून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही काळ जिल्हा बँकेत क्लार्क म्हणूनही काम केले. त्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. सांगरुळ हायस्कूलमधून सुरुवात केलेल्या आतकीरे यांनी वराडकर हायस्कूल कट्टा (ता. मालवण)व नंतर महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रदीर्घ सेवा बजावली. मराठी व समाजशास्त्र हे त्यांच्या अध्यापनाचे विषय होते.
महाराष्ट्र हायस्कूलच्या फुटबॉल संघाचे मॅनेजर म्हणून त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही काम पाहिले. १९६६ पासून ते प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या संस्थेच्या विविध बांधकामांवर देखरख करण्याची जबाबदारी सोपविली होती. १९८९ पासून ते संस्थेच्या कार्यकारी मंडळावर होते. १९९६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी ७५ हजारांची थैली
संस्थेच्या माजी विद्यार्थी मंडळातर्फे १७ डिसेंबर २०११ रोजी त्यांचा न्यू कॉलेजच्या पटांगणावर अमृतमहोत्सवी सोहळा झाला. यावेळी विद्यार्थी मंडळातर्फे दिलेली ७५ हजार रुपयांची थैली आतकीरे यांनी संस्थेकडे सुपूर्द करत वसतिगृहात राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी खर्च करावी असे सूचवले. संस्थेनेही ही रक्कम कायम ठेव म्हणून ठेवली. याचा अनेक होतकरू विद्यार्थ्यांना लाभ झाला.
फोटो 27062021-कोल- आर. डी. आतकीरे निधन