माजी क्रिकेटपटू अवधूत भाटवडेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:04+5:302021-07-04T04:17:04+5:30

एकेकाळी प्रायव्हेट हायस्कूल म्हणजे क्रिकेटपटूंची खाण म्हणून सर्वश्रुत होती. त्याच मुशीतून अवधूत भाटवडेकर हेही रत्न कोल्हापूरच्या क्रिकेटविश्वाला लाभले. शालेय ...

Former cricketer Avadhut Bhatwadekar passes away | माजी क्रिकेटपटू अवधूत भाटवडेकर यांचे निधन

माजी क्रिकेटपटू अवधूत भाटवडेकर यांचे निधन

एकेकाळी प्रायव्हेट हायस्कूल म्हणजे क्रिकेटपटूंची खाण म्हणून सर्वश्रुत होती. त्याच मुशीतून अवधूत भाटवडेकर हेही रत्न कोल्हापूरच्या क्रिकेटविश्वाला लाभले. शालेय स्तरावर हायस्कूलनंतर कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि नोकरीनंतर महाराष्ट्र बँकेतर्फे प्रतिनिधित्व करीत जिल्हा ते राज्य पातळीवरील सर्व स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या फिरकीचा करिश्मा दाखविला. यात १९७२ ते ७३ दरम्यान जसदनवाला चषक स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी तब्बल नऊ रणजीपटूंचा समावेश असलेल्या पुणे संघाचा खुर्दा उडविला. या स्पर्धेतील विजयानंतर अवधूत यांची महाराष्ट्र राज्य रणजी संघात निवड होणे अपेक्षित होते; मात्र झाली नाही. तरीही नाराज न होता त्यांनी के.एम.सी. आणि त्यानंतर महाराष्ट्र बँकेत नोकरी मिळाल्यानंतर अनेक स्पर्धा आपल्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने गाजविल्या. शिवाजी स्टेडियम व प्रायव्हेट हायस्कूलच्या जवळ राहत असल्याने ते कायम मैदानावर सराव करताना दिसत होते. क्रिकेटवर प्रेम करणारा हा फिरकीचा जादूगार शारीरिक व्याधींनी ग्रासला गेला. त्यामुळे मैदानावरील हजेरी कमी झाली होती. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या क्रिकेटविश्वात फिरकीचा जादूगार हरपल्याची भावना अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी व्यक्त केली.

फोटो : ०३०७२०२१-कोल-अवधूत भाटवडेकर

Web Title: Former cricketer Avadhut Bhatwadekar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.