हत्तीच्या हल्ल्यात घाटकरवाडीजवळ वनमजूर ठार; आजरा तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 14:40 IST2023-10-28T14:40:12+5:302023-10-28T14:40:23+5:30
ही घटना घाटकरवाडीच्या जंगलात सकाळी ११ वाजण्यास सुमारास घडली.

हत्तीच्या हल्ल्यात घाटकरवाडीजवळ वनमजूर ठार; आजरा तालुक्यातील घटना
आजरा : घाटकरवाडी ( ता. आजरा जि. कोल्हापूर) येथे हत्ती हुसकाविण्याची मोहीम सुरू असताना हत्तीनेच केलेल्या हल्ल्यात वनमजूर प्रकाश गोविंद पाटील ( वय ५४ रा. गवसे ता. आजरा ) हा जागीच ठार झाला आहे. ही घटना घाटकरवाडीच्या जंगलात सकाळी ११ वाजण्यास सुमारास घडली.
सकाळी ९ वाजल्यापासून आजरा परिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांकडून हत्ती हुसकाविण्याची मोहीम हाती घेतली होती. हत्तीला हुसकाविवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून हाकाऱ्या सुरू होत्या. अचानक मोठ्या गर्द झाडीतून हत्ती समोर आला. त्यांने प्रकाश पाटील यांना सोंडेत घेऊन गरागर फिरवले व जमिनीवर आपटले व त्या ठिकाणी मोठ्याने चित्तकारला.
थोड्यावेळाने हत्ती त्याठिकाणाहून जंगलात निघून गेला. दरम्यान सोबत असणारी कर्मचारी भितीने इतरत्र पळून गेले. थोड्यावेळाने येऊन पाहिले असता प्रकाश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला झाल्याचे लक्षात आले. तातडीने वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.