पैसे मागणाऱ्यावर फौजदारी
By Admin | Updated: February 23, 2015 00:18 IST2015-02-22T23:54:59+5:302015-02-23T00:18:49+5:30
आधारकार्डसाठी प्रशासन सतर्क : चालढकल करणाऱ्या बॅँकांवरही नजर

पैसे मागणाऱ्यावर फौजदारी
]प्रवीण देसाई - कोल्हापूर -आधारकार्ड काढण्यासाठीही काही ठिकाणी लोकांना रांगेत उभे राहून शंभर रुपये मोजावे लागत आहेत; तर झिरो बॅलन्सवर खाती उघडा, असे सरकारचे स्पष्ट आदेश असतानाही त्यांना या योजनेतील बॅँकांकडून हरताळ फासला जात आहे. जिल्हा प्रशासनाने हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला असून, ‘आधार’साठी पैसे घेणाऱ्यांवर फौजदारी केली जाणार आहे. शिवाय लोकांना नाडवणारे बॅँकांचे अधिकारी व कर्मचारी यांचीही गय केली जाणार नाही.
रेशनचे अनुदान बॅँक खात्यावर जमा करण्याची योजना केंद्र सरकारने हाती घेतली आहे. दारिद्र्यरेषेखालील व पिवळ्या कार्डधारकांसाठी असणाऱ्या या योजनेची प्रत्यक्ष अमलबजावणी पुढील महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत कार्डवरील प्रत्येक व्यक्तीच्या नावावर शंभर रुपये जमा होणार आहेत. यासाठी नागरिकांचे बॅँक खाते व आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे सध्या बॅँका व आधारकार्डसाठीे लोकांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. आधारकार्ड हे नागरिकांना पूर्णपणे मोफत द्यायचे आहे. याचे पैसे सरकार संबंधित कंपनीला देणार आहे; परंतु काही ठिकाणी लोकांकडून कार्डसाठी शंभर-शंभर रुपये उकळले जात आहेत. याबाबत कोल्हापूर शहरासह इचलकरंजीतूनही जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी आल्या आहेत. तसेच या योजनेसाठी झिरो बॅलन्सवर खाते उघडण्याचे आदेशही संबंधित बॅँकांना सरकारकडून देण्यात आले आहेत; परंतु या योजनेसाठी नेमलेल्या काही बॅँका सोडल्या, तर अन्य बॅँकांमध्ये हे खाते काढायला येणारा माणूस म्हणजे ‘फुकटचे गिऱ्हाईक’ या भावनेतूनच त्याच्याशी व्यवहार केला जात आहे. ‘खात्यावर काहीतरी भरा; त्याशिवाय खाते उघडता येणार नाही,’ असे सांगून त्यांना हेलपाटे मारायला लावले जात आहेत. या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. या योजनेत जिल्ह्यातील जवळपास ४५ बॅँकांचा समावेश आहे.
या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत योजनेवर याचा विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी आधारकार्डसाठी पैसे घेणाऱ्यांवर थेट फौजदारी करण्याचे पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे. तसेच या योजनेसाठी बॅँकेत काढाव्या लागणाऱ्या खात्यासाठी त्यावर पैसे भरायला लावणे व ते न भरल्यास लोकांना हेलपाटे मारायला लावणे, आदी तक्रारींमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे यासाठी संबंधित बॅँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही फौजदारी कारवाई होणार आहे. यासाठी संबंधित नागरिकांनी तोंडी तक्रार न देता ती लेखी स्वरूपात तहसीलदारांकडे द्यावयाची आहे. त्यानंतर त्यांच्यावर रितसर फौजदारी दाखल केली जाणार आहे.
‘आधार’ कार्डसाठी नागरिकांनी केंद्रचालकांना पैसे देण्याची गरज नाही; कारण त्यांना सरकारकडून पैसे दिले जात आहेत. तरीही जर कोणी पैसे मागत असेल, तर संबंधितांविरोधात थेट लेखी तक्रारी अर्ज तहसीलदारांकडे द्यावा. त्यानंतर त्यांच्यावर फौजदारी दाखल केली जाईल.
- विवेक आगवणे,
जिल्हा पुरवठा अधिकारी
‘आधार’ केंद्रांना जोडली रेशन दुकाने
या योजनेमध्ये आधार कार्डच्या केंद्रांना रेशनची दुकाने जोडण्याचे काम सुरू झाले आहे. याची सुरुवात इचलकरंजी येथून झाली आहे. कोल्हापूर शहरातही हे काम लवकरच सुरू होणार आहे. या केंद्रांमध्ये फलक लावणे अनिवार्य केले असून, नागरिकांना नि:शुल्क सेवा देण्यासंदर्भात केंद्रचालकांना बजावण्यात आले आहे. त्याचबरोबर कार्ड काढण्यासाठी होणाऱ्या जादा वेळामुळे नागरिकांना त्रास होत आहे, याचीही दखल प्रशासनाने घेतली आहे.