रुग्णालयानांच रेमेडेसिविर द्यायला भाग पाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:19+5:302021-05-08T04:25:19+5:30
कोल्हापूर : कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाइकांनी धावाधाव करून त्याची काळ्याबाजारातून खरेदी करू नये, हॉस्पिटलनाच हे इंजेक्शन ...

रुग्णालयानांच रेमेडेसिविर द्यायला भाग पाडा
कोल्हापूर : कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाइकांनी धावाधाव करून त्याची काळ्याबाजारातून खरेदी करू नये, हॉस्पिटलनाच हे इंजेक्शन रुग्णांना द्यायला भाग पाडा. ते दाद देत नसतील तर जिल्हा प्रशासन किंवा पोलिसांकडे दाद मागा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे अव्वर सचिव हेमंत महाजन यांनी शुक्रवारी केले आहे.
सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये रेमडेसिविर व टॉसीलायझुमॅब या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने त्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होऊन नातेवाइकांची लूट केली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे. पूर्वी रेमडेसिविरचा पुरवठा उत्पादक ते स्टॉकिस्ट, घाऊक विक्रेते, वितरक व मेडिकल असा केला जात होता. मात्र त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली उत्पादक ते थेट कोविड सेंटर असा प्रवास होत असल्याने बाजारात कुठेही इंजेक्शन मिळणार नाही. तरीही काही हॉस्पिटलमधून रोजचा कोटा शिल्लक असतानाही सर्वसामान्य रुग्णालाही रेमडेसिविरची ६ ते १० इंजेक्शन आणण्याची चिठ्ठी दिली जात आहे. यामुळे नातेवाईक काळाबाजारवाल्यांच्या गळाला लागून हे इंजेक्शन २० ते ३० हजारांत घेत आहेत. अशावेळी नातेवाइकांनी डॉक्टरांना किंवा रुग्णालयाच्या व्यवस्थापनालाच नियमानुसार इंजेक्शन द्यायला भाग पाडावे. ते दाद देत नसल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्या रुग्णालयास फोन करण्याची विनंती करावी, अन्यथा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.
--
एचआरसीटी स्कोअर तपासा
सर्वसामान्य रुग्ण : १ ते ७/२५
मॉडरेट : ८ ते १६/२५
गंभीर : १७ ते २५/२५
मॉडरेट आणि गंभीर या प्रकारांतील रुग्णांनाच रेमडेसिविर व तत्सम इंजेक्शन द्यावी लागतात. सर्वसामान्य रुग्णांना त्याची गरज नाही.
----